
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारस पत्र हे जाती-आधारित भेदभावाचे कृत्य असल्याचा आरोप केला आहे. प्रेम बिऱ्हाडे नामक विद्यार्थ्याचे महाविद्यालयात शिकत असतानाचे वर्तन असमाधानकार
.
प्रेम बिऱ्हाडे नामक तरुण लंडनमध्ये नोकरी करत आहे. त्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याला एका नोकरीसाठी आपल्या कॉलेजचे शिफारसपत्र लागत होते. पण महाविद्यालयाने त्याला ऐनवेळी हे शिफारस पत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची हातची नोकरी गेली. त्याने एका व्हिडिओद्वारे हा प्रकार उजेडात आणल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या व्यवहारावर टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाविद्यालयाने यापूर्वी का प्रमाणपत्रे दिली?
प्रकाश आंबेडकर या प्रकरणी प्राचार्यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना म्हणाले, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रेम बिऱ्हाडे यांना ते प्रस्तुत महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना त्यांनी केलेले असमाधानकारक वर्तन व शिस्तभंगाच्या रेकॉर्डमुळे शिफारसपत्र जारी करण्यात आले नाही. पण त्यांनी आपल्या पत्रात त्यांना यापूर्वी 3 शिफारस पत्रे व बोनाफाईड प्रमाणपत्रही जारी करण्याचे मान्य केले आहे. प्रेम बिऱ्हाडेने हे प्रमाणपत्र यूकेमधील प्रवेश प्रक्रियेसाठी वापरले होते.
प्रेम बिऱ्हाडे वर्तन मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे वर्तन खरोखरच असमाधानकारक होते, तर त्याच महाविद्यालयाने त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेटसह एक, दोन नव्हे तर तब्बल तीन शिफारस पत्रे जारी का केली? हे प्राचार्या कसे स्पष्ट करून सांगतील. ही शिफारस पत्रे व बोनाफाईड त्याने यूकेच्या विद्यापीठात प्रवेशासाठी वापरले होते.
ही दलित विद्यार्थी पुढे जात असल्याची अस्वस्थता
मग काय बदलले? तेव्हा तो शिफारसीसाठी योग्य का होता? पण आता परदेशात आपली जागा पक्की केल्यानंतर त्याच्या कॉलेजला त्याचे चारित्र्य अचानक समस्याप्रधान का वाटले? प्रामाणिकपणे सांगायचे तर हा प्रकार शिस्तीबद्दल नाही. हा अस्वस्थतेचा मुद्दा आहे. दलित विद्यार्थाने समाजाने निश्चित केलेल्या मर्यादा शांतपणे ओलांडण्याचे धाडस दाखवल्यामुळे निर्माण झालेली ही अस्वस्थता आहे.
महाविद्यालयाने जे केले आहे ते केवळ अनैतिक नाही, तर ते लक्ष्यित आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे. ही जातीय पूर्वग्रहात रुजलेली शैक्षणिक तोडफोड आहे. त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी, त्यांनी त्याचा मार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. आपण याला जाती-आधारित भेदभाव म्हणू शकतो. हे फक्त चुकीचे नाही, तर ते गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचा थेट राज्य सरकारवर निशाणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा निषेध करत सरकार अशा सनातनी व मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना किती पाठिशी घालणार? असा सवाल केला आहे. “धर्म नहीं जाती पूछी” – सनातनी मनुवाद्यांचा जातीवाद अजूनही संपलेला नाही. एका दलित विद्यार्थ्याला आलेला हा अनुभव अतिशय दुर्दैवी आहे. परदेशात नोकरी मिळालेला हा तरुण, याची कंपनी, ‘हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजला होता का अशा पद्धतीची पडताळणीसाठी कॉलेजकडून माहिती मागवते. आणि धक्कादायक म्हणजे कॉलेज प्रशासन जातीवाद डोक्यात ठेवून या दलित तरुणाची खोटी माहिती कंपनीला देतात. या तरुणाची नोकरी जाते. त्यानंतर या तरुणाने धाडसाने कॉलेज प्रशासनाची केलेली पोलखोल सनातनी मनवाद्यांची मनोवृत्ती दाखवते.
नोकरीसाठी पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्याची जात विचारणं आणि ती जात समजल्यावर मुद्दाम त्रास देणे हा अतिशय अमानवी प्रकार आहे. ज्या संविधानाने समता, सामाजिक न्याय आणि समान संधींची ग्वाही दिली, त्यालाच या मनुवाद्यांनी तिलांजली दिली. फडणवीस, यावर काही कारवाई करणार की तुमच्या या सनातनी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणार? काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे, महाविद्यालयाने माफी मागून विद्यार्थ्याला नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.