
Real Estate News Rs 500 Crore Land Deal In Kalyan Dombivali: मुंबईमधील जमिनीला सोन्याचे भाव असून अनेकदा मुंबईतील जमिनींच्या व्यवहारांची चर्चा होताना दिसते. मात्र सध्या चर्चा आहे ती कल्याण-डोंबिवलीमधील एका मोठ्या व्यवहाराची. या व्यवहारामध्ये तब्बल 500 कोटी रुपयांमध्ये जमिनीचा सौदा झाला आहे. विशेष म्हणजे ही जमीन एका परदेशी कंपनीला विकण्यात आली असून या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीमध्ये रोजगार निर्मितीला वाव मिळणार आहे. 24 एकरांच्या जमिनीचा हा व्यवहार सध्या कल्याण-डोंबिवलीमध्ये चर्चाचा विषय ठरतोय.
नेमका व्यवहार काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या लोढा डेव्हलपर्सने हा 500 कोटींचा व्यवहार केला आहे. सिंगापूरमधील एसटी टेलिमीडिया ग्लोबल डेटा सेंटर्स (एसटीटी जीडीसी) या कंपनीला लोढाने 24 एकर जमीन विकली आहे. या ठिकाणी एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स उभारले जाणार असून त्यासाठीच ही जमीन विकत घेण्यात आली आहे. जमीन कराराची नोंदणी आधिक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये डेटा सेंटर सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ही 24.34 एकर जमीन विकत घेतली असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार
लोढा डेव्हलपर्सने 1.74 एकर विकली आहे. लोढाची उपकंपनी पलावा इंडसलॉजिक 4 प्रायव्हेट लिमिटेडने 22.6 एकर जमीन एकूण 499 कोटी रुपयांना विकली आहे, असे त्यांनी सांगितले. लोढा समुहाने जमिनीच्या करारासंदर्भात कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, लोढा डेव्हलपर्सने पलावा येथे ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या सामंजस्य करारात असे नमूद केले आहे की एकूण प्रस्तावित गुंतवणूक 30 हजार कोटी रुपयांची असेल, ज्यामुळे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: डोंबिवलीतलं 8 कोटींचं घर पाहिलं का? असं काय खास आहे या घरात? एरिया किती? लोकेशन…
कसा असणार हा डेटा सेंटर प्रोजेक्ट?
370 एकरांवर पसरलेल्या या पार्कची क्षमता 2 गिगावॅट इतकी असणार असून अनेक आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्या या ठिकाणी येतील असा विचार करुन हे सेंटर डिझाइन केलेले आहे. “लोढा आणि या पार्कमधील विविध डेटा सेंटर कंपन्यांकडून 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकत्रित गुंतवणूक अपेक्षित आहे,” असे कंपनीने म्हटले होते.
लोढा समुहाकडे भरपूर जमीन
लोढा डेव्हलपर्सची पलावा येथे भरपूर जमीन आहे. या जमिनीवर गृहनिर्माण, व्यावसायिक दुकाने, गोदामे आणि डेटा सेंटर प्रकल्पांचा समावेश असलेली टाउनशिप उभारण्यासाठी वापर केला जात आहे. लोढा डेव्हलपर्सने सुमारे 100 दशलक्ष चौरस फूट रिअल इस्टेट क्षेत्राचं बांधकाम आतापर्यंत वितरित केले आहे. तसेच कंपनीच्या सध्या सुरु असलेल्या आणि नियोजित पोर्टफोलिओ अंतर्गत 110 दशलक्ष चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्र विकसित केले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.