
Raj Thackeray Uddhav Alliance Inquiry: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू मनसेच्या स्थापनेनंतर 19 वर्षांनी एकाच मंचावर आले. त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले. याच संभाव्य युतीची नांदी म्हणून बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन शिवसेनेंनी युती केली आहे. असं असतानाच आता या युतीच्या घोषणेनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधुची युती होणार आहे. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. बेस्टच्या पतपेढी निवडणुकीच 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित लढणार आहे.
चौकशीचे आदेश
पतपेढीच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणाऱ्या बेस्ट पतपेढीची चौकशी होणार आहे. बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्था तसेच पतपेढीवर काही सभासदांना महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सहकार विभागाची नोटीस आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अंतर्गत तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. 2024-25 मधील सर्व आर्थिक व्यवहार आणि कामकाजाची चौकशी केली जाणार आहे. मागील नऊ वर्षे या पतपेढीवर ठाकरे गटाची सत्ता होती, या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
कोण करणार चौकशी?
गजानन गायकवाड यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जितेंद्र इंद्रलाल चटर्जी यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> ‘लोढा-बिढासारखी माणसं…’, जैन समाजासाठी कबुतरखान्यावर पोहचलेल्या लोढांना राज ठाकरेंनी सुनावलं
उमेदवारीवरुन वाद
शिवसेना ठाकरे गटाच्या पॅनेलमधून शिवसेना शिंदे गटाची महिला पदाधिकारी निवडणूक लढत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा संघटिका बबिता पवार यांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये समावेश आहे. बबिता पवार या शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय आहेत. बबिता पवार यांना पॅनेलमध्ये घेतल्याने ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तरच त्याची उमेदवारी कायम ठेवा, अन्यथा त्यांना पॅनेलमधून बाहेर काढा असा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पदाधिकारी यांनी वरिष्ठांची भेट घेवून नाराजी कळवली आहे. अंतर्गत गोंधळ असतानाच आता या पतपेढीच्या चौकशीचा घाट सरकारने घातला आहे.
FAQ
बेस्ट पतपेढी निवडणूक कधी होणार आहे?
उत्तर: बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे.
या निवडणुकीत किती जागा आहेत आणि जागावाटप कसे आहे?
उत्तर: निवडणुकीत एकूण 21 जागा आहेत. यापैकी ठाकरे गट 19 जागांवर, तर मनसे 2 जागांवर ‘उत्कर्ष पॅनल’ अंतर्गत निवडणूक लढणार आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची पार्श्वभूमी काय आहे?
उत्तर: 5 जून 2025 रोजी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू 19 वर्षांनंतर प्रथमच एका मंचावर आले. त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. या संभाव्य युतीची नांदी म्हणून बेस्ट पतपेढी निवडणुकीत युती झाली आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत युतीचे महत्त्व काय आहे?
उत्तर: ही युती ठाकरे बंधूंची पहिली अधिकृत निवडणूक युती मानली जाते. याचा प्रभाव आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे, कारण ही निवडणूक राजकीय समीकरणांना दिशा देऊ शकते.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत कोणत्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत?
उत्तर: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अंतर्गत बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 2024-25 मधील आर्थिक व्यवहार आणि कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
चौकशीसाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: गजानन गायकवाड यांची तपासणी अधिकारी आणि जितेंद्र इंद्रलाल चटर्जी यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.