
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण भारतासाठी तारक नव्हे तर मारक असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. या सरकारने अमित शहांचा म
.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज धाराशिव जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारचा कारभार हा कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा आहे. त्यांना आपल्या राज्याचे दिवाळे वाजले तरी चालेल. सध्या राज्यावर 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. 9 वर किती शून्य हे मोजायलाही फार अवघड आहे. जेव्हा राज्यावर कर्ज येते, याचा अर्थ राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर हे कर्ज येते. हे कसे फेडणार? कोण फेडणार? कधी फेडणार? व कर्जातून बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती केव्हा करणार? कारण, हे कर्ज काढून कंत्राटदारांच्या हितासाठी रस्त्यांचे, पुलांचे, धरणांची कामे करत असाल, तर मी त्याला विकास मानायला तयार नाही. कारण हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
सरकारचे ढोंग व बिंग आता फुटले
उद्धव ठाकरेंनी यावेळी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप अर्थात बोगस जनता पार्टीचे ढोंग आता उघडे पडले आहे. आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहांचा मुलगा जय शहा याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा व देशभक्तीचा चुराडा करणारे हे सरकार आहे. हे ढोंग व हे ढोंगी यांचे बिंग आता फुटले आहे. आम्हाला यांची लाज वाटते. कणखरपणा दाखवत पाकसोबत क्रिकेट खेळले नसते तर काय बिघडले असते?
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले होते. हे शिष्टमंडळ मायदेशी परतले. त्यांनी तिकडे काय सांगितले त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याविषयी कुणालाही काहीही सांगण्यात आले नाही. या शिष्टमंडळाने आपल्या दौऱ्यात पाकिस्तान दहशतवाद करतोय असे सांगितले असेल असे आम्हाला वाटते. असे असेल तर जगातील इतर देश पाकविरोधातील युद्धात भारताच्या मागे का उभी राहिला नाही असा आमचा प्रश्न आहे. हे सर्व विसरून तुम्ही त्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार असाल, तर जग तुम्हाला तुम्ही पाकचे मित्र आहात की शत्रू आहात? हा प्रश्न विचारेल.
शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा, मग आम्ही तुमच्या पाठिमागे उभे राहतो. आम्ही पाकच्या विरोधात उभे टाकायचे आणि तुम्ही तिकडे जाऊन केक खायचा असा प्रश्नही जग विचारेल. त्यामुळे मोदींचे परराष्ट्र धोरण देशासाठी तारक नव्हे तर मारक आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना देशभक्ती माहिती नाही. त्यांना फक्त खुर्चीभक्ती, शहाभक्ती व मोदीभक्तीच माहिती आहे. त्यांनी देश वगैरे हा शब्दही उच्चारू नये. मग हे कुणीही लोक असले तरी ते फडतूस आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची गरज
उद्धव ठाकरे यांनी यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत करण्याचीही गरज व्यक्त केली. सध्या सर्वत्र अतिवृष्टी व ढगफुटी होत आहे. सगळीकडे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मोजके पैसे वाटून मोकळे होणार. पण पंचनाम्यापूर्वीच शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम सरसकट देण्याची गरज आहे. तुम्ही देवाभाऊ नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करता. त्याचा पंचनामा कोण करणार? हे पैसे आले कुठून? त्यासाठी पैसे दिले कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर फुले वाहताना जाहिरात केली. त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. हे पैसे केवळ एका माणसासाठी उधळणार असाल, तर ते कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय बिघडले असते, असे ते म्हणाले.
राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही भाष्य
उद्धव ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जवळपास अडीच तास वेळ घालवला. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते हसत म्हणाले, मी गेलो नाही किंवा गेलो तरी त्याची चर्चा होते. नेमकी अडचण माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते इथे मातोश्रीवर आले होते. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही माध्यमात चर्चा झाली.
राज ठाकरे शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात दिसणार का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, येतील पण माध्यमांनी जरा थांबावे. राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात भेट देण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, मावशी (राज ठाकरेंची आई) मला घरी येत रहा, असे मागच्या वेळी म्हणाली होती. त्यामुळे आमचे आता असेच येणे-जाणे सुरू आहे.
अधिकृत युती कधी जाहीर करणार?
राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल.’ यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र करत पत्रकार परिषद हसत हसत संपवली.
पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे. पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा देणार? असाही प्रश्न यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी माझे शत्रू नाहीत. ते मला शत्रू मानत असतील पण मी त्यांना शत्रू मानत नाही. पण ते ज्या पद्धतीने शिवसेना संपवायला निघाले आहेत, हे राजकारण आम्ही सहन करू शकत नाही. त्यांच्या मनात पाप असले तरी मी त्यांना शुभेच्छा देतो की, त्यांना सर्व गोष्टींचे आकलन व्हावे आणि उरलेल्या टर्ममध्ये त्यांनी चांगले काम करावे.
आम्ही पक्षप्रवेशाची जाहिरात करत नाही
आमच्या पक्षात दररोज नवनवे प्रवेश होतात. पण प्रत्येकवेळी आम्ही याला धक्का, त्याला धक्का म्हणून जाहिरातबाजी करत नाही. आज आमच्या पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्याही ऑफर्स होत्या. या ऑफर्स कशा असतात हे सर्वांना माहिती आहे. पण त्या सगळ्या आमिषांना पाठ दाखवून हे लोक शिवसेनेत आलेत. या नव्या प्रवेशांमुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.