
Uddhav Thackeray Shivsena On Aurangzeb Tomb Controversy: “मुख्यमंत्री फडणवीस हे राणाभीमदेवी थाटात फक्त भाषणे करतात, पण प्रत्यक्षात कृती मात्र काहीच करीत नाहीत हे वारंवार दिसत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगल उसळली. पोलिसांवर हल्ले झाले. नागपुरात जाळपोळीचा भडका उडाला. नागपूरला 300 वर्षांचा इतिहास आहे. या 300 वर्षांत कधी दंगल घडल्याची नोंद नाही. मग आताच भडका का उडाला? फडणवीस म्हणतात, हे दंगलखोर बाहेरचे होते. बाहेरचे दंगलखोर शहरात येऊन हैदोस घालीपर्यंत पोलीस काय करीत होते? गृहखात्याचे गुप्तचर झोपा काढीत होते काय?” असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून…’
“बीडमध्ये खंडण्या, हत्यासत्र संपलेले नाही. परभणीतही दंगल झाली. कोकणात होळीच्या सणात नवहिंदुत्ववाद्यांनी दंगलीची ठिणगी टाकली. राज्याचे मंत्री धार्मिक द्वेष वाढेल अशी भाषणे देतात व गृहमंत्री हात चोळत बसले आहेत. याला राज्य करणे म्हणत नाहीत. औरंगजेबाचे महिमामंडन महाराष्ट्रात कोणीच करणार नाही. येथे फक्त छत्रपती शिवरायांचाच जयजयकार होईल. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी आणि भाजपमधील नवहिंदुत्ववादी चोंगट्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले व महाराष्ट्रातले वातावरण बिघडवले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
केंद्राने लगेच कबरीचे संरक्षण हटवावे आणि…
“औरंगजेबाची कबर कायमची उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन करण्याची धमकी दिली. कबर हटविण्यासाठी कारसेवा करण्याची योजना जाहीर केली. औरंग्याच्या कबरीची तुलना ते अयोध्येतील बाबरी मशिदीशी करत आहेत. बाबरीप्रमाणे औरंग्याची कबर तोडू असे हे लोक सांगतात. त्यासाठी हे लोक कुदळ, फावडी, पहारी, जेसीबी, बुलडोझर वगैरे गोळा करायला लागले. ही सरळ सरळ नौटंकी आहे. औरंग्याची कबर तोडायला हा तमाशा करण्याचे कारण नाही. औरंग्या कबरीखाली आहे व तो काही उठून बाहेर येत नाही. कबरीस आता राज्य राखीव सुरक्षा दलाचे संरक्षण आहे. ही कबर भारताच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असल्याने त्याचे बाप केंद्रात बसले आहेत. केंद्राने लगेच हे संरक्षण हटवावे आणि कबरीस जो संरक्षित वास्तूचा दर्जा दिला तो काढून घ्यावा. म्हणजे ही जमीन मोकळी होईल व संघर्षाचा भडका उडणार नाही. येथे कारसेवेचीही गरज नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
…त्यामुळे दंगल टळेल व माथेफिरूंची डोकी शांत होतील
“बाबरीच्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. उत्तर प्रदेशात कल्याणसिंगांचे भाजप सरकार होते. त्यामुळे संघर्ष झाला. आज केंद्रात मोदी व महाराष्ट्रात फडणवीस आहेत. दोघेही भाजपचे. पुन्हा फडणवीस यांना अयोध्येतील कारसेवेचा अनुभव आहे. त्यामुळे स्वतः मोदी, फडणवीस, मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार या पाच जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन सरकारी आदेश म्हणून औरंग्याच्या कबरीचे उत्खनन करावे. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगल टळेल व माथेफिरूंची डोकी शांत होतील,” असा खोचक सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.