
मोर्शी येथील आठवडी बाजारातील मटन मार्केटमुळे संपूर्ण परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी व आंदोलन करूनसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरे
.
मोर्शीच्या आठवडी बाजारातील मटन मार्केटने बाजार परिसरातील जवळपास ३० टक्के परिसर व्यापला आहे. येथील नगरपरिषदेने त्या व्यवसायिकांना ओटे बांधून दिले आहेत. परंतु मटन मार्केटच्या इमारतीमध्ये बसून व्यवसाय करायला कोणीही तयार नाही. आठवडी बाजारातील रिकाम्या जागेत उघड्यावर चिकन-मटनची दुकाने थाटलेली असतात. मोर्शीत मंगळवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे व्यवसायिक आणि बाजाराला येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबना होते. सध्या या संपूर्ण परिसरात हलाल केलेल्या जनावरांचे अवशेष उघड्यावर पडले असून त्यावर वराह आणि कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. हा मुक्त संचार दिवस-रात्र सुरु असतो. त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे.
परिसरात दुर्गंधी पसरलेली असल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना भोगावा लागतो. ही बाब नित्याचीच झाल्याने नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला. परंतु वारंवार मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. आठवडी बाजाराच्या दिवशी (मंगळवारी) याच परिसरात भाजीपाला, फळे व खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. स्वाभाविकच त्या भागातील घाणीमुळे तेथे आलेले किटाणू वातावरणद्वारे या दुकानांमध्येही येतात. भविष्यात त्यामुळे मोठी रोगराईही निर्माण होऊ शकते, हेही स्थानिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. परंतु अद्याप कोणतेही पाऊल उचलेले गेले नाही. नगरपालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनीसुद्धा याबाबत प्रशासनाकडे तक्रार नोंदविली. मात्र त्याचाही फारसा परिणाम झाला नाही.
आठवडी बाजारातून जाणारा मुख्य रस्ता पेठपुरा परिसराला जोडला जातो. या रस्त्याने महिलावर्ग आणि शालेय विद्यार्थी यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनीही बाजारातील अस्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष घालायला सांगितले. परंतु तरीही प्रश्न कायमच आहे. तर दुसरीकडे थेट जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख जिल्हाधिकारी यांच्याकडेच तक्रार नोंदविण्यात आल्याने येत्या काळात काही उपाययोजना होईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.