
Uddhav Thackeray Shivsena Questions Eknath Shinde Suporters: कॉमेडियन कुणाल कामराने अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एका गाण्यामधून केलेल्या टीकेवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारी रात्री शिंदे समर्थकांनी कुणाल कामराचं पॉडकास्ट स्टुडिओ असलेल्या खारमधील हॉटेलमध्ये तोडफोड केली. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या हल्लोखोरांना जमीनही मंजूर झाला आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेंचे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे समर्थकांना एक सवाल केला आहे. नेमकं काय म्हटलंय ठाकरेंच्या शिवसेनेनं जाणून घेऊयात…
तोडफोड सुरू असताना पोलीस मूक दर्शक होते किंवा…
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे. “टीका केल्याचे निमित्त करून मोदी समर्थक शिंदे गटाने एका ‘पॉडकास्ट स्टुडिओ’वर हल्ला केला. स्टुडिओ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले. कुणाल कामरा या ‘पॉडकास्ट’ कलाकारास ठार मारण्याची धमकी दिली. मुंबई शहरात हे अराजक सुरू असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करीत होते व त्यांचे पोलीस काय करीत होते?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे. “तोडफोड सुरू असताना पोलीस मूक दर्शक होते किंवा तोडफोड करणाऱ्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत होते. मोदी समर्थक शिंदे गटाने कामराच्या स्टुडिओची तोडफोड करताच मुंबई महापालिका जागी झाली व सुस्त पडलेले बुलडोझर घेऊन स्टुडिओवर पोहोचली. स्टुडिओतील अनेक कामे बेकायदेशीर असल्याचे ठरवून पालिकेने ती तोडली. स्टुडिओत चुकीचे काम झाले हे पालिकेला शिंद्यांवर टीका केल्यावर समजले, हासुद्धा विनोदच म्हणायला हवा,” असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
कारवाई करण्याचे सोडून गृहमंत्री…
“मोदी म्हणतात, टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे. इथे लोकशाही आणि आत्मा दोन्ही पायदळी तुडवून मोदी समर्थकांनीच नंगानाच घातला आहे. पॉडकास्ट स्टुडिओवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे सोडून गृहमंत्री कुणाल कामराला सांगतात, ‘‘शिंदे यांची माफी मागा व प्रकरण मिटवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काही नाही.’’ फडणवीस यांच्या वाडवडिलांनी आणीबाणी काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध संघर्ष केला. आणीबाणीविरुद्ध हे लोक तुरुंगात गेले होते व इंदिरा गांधींविरुद्ध लढा पुकारला होता हे आता खरे वाटत नाही,” असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं फडणवीसांनाही लक्ष केलं आहे.
शिंद्यांचे लोक कुणाल कामरावर हल्ला करतात, पण…
“‘माफी मागा व सुटा’ हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे धोरण दिसते. पॉडकास्ट करणाऱ्याने चुकीची व बदनामीकारक टीका केली असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते, पण गुन्हा सिद्ध होण्याआधीच धमक्या, मारहाण, तोडफोड करणे हे गुंडाराज आहे. या गुंडाराजला गृहमंत्री फडणवीस उघड समर्थन देत आहेत,” असं म्हणत फडणवीसांच्या भूमिकेवरुन ठाकरेंच्या सेनेनं निशाणा साधला आहे. “शिंद्यांचे लोक कुणाल कामरावर हल्ला करतात, पण शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरविरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. मग शिवरायांचा अपमान करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोरटकरला महाराष्ट्र सरकारने बहाल केले आहे काय?” असा सवालही ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंच्या घराकडे कूच करणार आहेत काय?
ठाकरेंच्या शिवसेनेनं याच मुद्द्यावरुन थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनेला सवाल केला आहे. “मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेत बरेच ‘खोक्याभाई’ बसले आहेत.’’ हे विधान वास्तव दर्शविणारे आहे. पन्नास खोके घेऊन ज्यांनी पक्षांतर केले व त्याच खोक्यांच्या ताकदीवर निवडून आले त्या सगळ्यांना राज ठाकरेंनी ‘खोक्याभाई’ म्हटले. सरकार याच ‘खोक्याभाईं’चे आहे. आज ‘खोक्याभाई’ची उपमा दिली म्हणून शिंद्यांचे लोक राज ठाकरेंच्या घराकडे कूच करणार आहेत काय?” असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.