
Ajit Pawar Sharad Pawar Alliance Against BJP: राज्यामध्ये पुढील काही आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकींमध्ये काही वेगळे आणि आश्चर्याचा धक्का देणारे प्रयोग पाहायला मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच एका शक्यतेनुसार साधारण अडीच वर्षांपूर्वी पक्षात फूट पडून वेगळ्या झालेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशी चर्चा कशामुळे?
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे बालेकिल्ले स्वबळावर लढवण्याचा तिन्ही पक्षांचा विचार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यामध्ये स्वबळाचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. असं असतानाच आता यापैकी एका ठिकाणी पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यासंदर्भातील सूचक विधान एका खासदाराने केलं आहे.
चिंताजनक बाब
बारामतीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या तसेच अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी सुप्रिया त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत महावितरणाच्या कार्यालयात आल्या होत्या. भोर, मुळशी, वेल्हा तालुक्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय. दुर्गम भागात लोकांना आजही वीज मिळत नाही ही चिंताजनक बाब असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काय प्रश्न विचारण्यात आला?
पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवारांना सोबत घेणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी पुणे शहरात पडद्याआडून छुपी युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांकडून थेट प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी ही शक्यता फेटाळून लावली नाही. या प्रश्नावर सुप्रिया यांनी सूचक उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
सूचक विधानाने चर्चांना उधाण
पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी परस्पर सामंजस्याने एकत्र लढू शकतात, खरंच तसे काही चान्सेस आहेत का? असा सवाल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी, “मी आत्ताच कसं यावर बोलू? कायकर्ते काय ठरवतील त्यावर चर्चा करू मग यावर बोलू,” असं उत्तर दिलं. म्हणजेच, थोडक्यात पुणे मनपात भाजप स्वबळावर लढणार असेल तर त्याला काऊंटर म्हणून दोन्ही राष्ट्रवादी आतून परस्पर सामंजस्य करून छुपी युती करून लढू शकतात ही शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळलेली नाही. त्यामुळेच पुण्यातील महापालिका निवडणूक अधिक रंजक होणार आहे. पुणे ही महाराष्ट्रातील मुंबईखालोखालची दुसरी सर्वात मोठी महापालिका आहे.
पैशांचा उपव्यय
आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आलीय, हे आता भुजबळांनीच जाहीर केलंय. मग सरकार काय करतंय तरी काय? लाडकी बहीण योजनेतली नावं कट होत आहेत. पूरग्रस्तांना मदत सोडाच उलट ऊस उत्पादकांकडे पैसे मागताहेत. केंद्राकडे अजून साधा प्रस्ताव ही पाठवला नाही ही लाजीरवाणी बाब आहे. एकीकडे पैसे नाही म्हणता आनंदाचा शिधा देण्यासाठी मग दुसरीकडे 80 हजार कोटींचा शक्तीपीठ रस्ता बांधण्यासाठी घाट कशासाठी घालता? असा थेट सवाल सुळेंनी राज्य सरकारला विचारला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.