
MMRDA on why 4 lane Mira-Bhayandar flyover narrows Into 2 lanes: मिरा-भाईंदरमधील एक उड्डाणपूल सध्या केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चार मार्गिका असलेला हा उड्डाणपूल अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याचा व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. अनेकांनी या रचनेवरुन टीकेची झोड उठवलेली असतानाच आता यासंदर्भात उड्डाणपुलाचं काम करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या व्हायरल उड्डाणपुलाची रचना सदोष नसल्याचं सांगतानाच हा उड्डाणपूल असाच बांधणं अपेक्षित होतं हे सांगताना नेमकं यामागील कारण काय आहे हे सुद्धा सांगितलं आहे. एमएमआरडीएने काय म्हटलंय पाहूयात…
या ब्रिजचा विषय काय आहे?
दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेअंतर्गत एमएमआरडीएकडून मिरा-भाईंदरमध्ये तीन ठिकाणी तीन दुमजली उड्डाणपूल (डबल डेकर पूल) बांधण्यात आले आहेत. त्यातील मिरा-भाईंदर येथील गोल्डन नेस्ट या ठिकाणी बांधण्यात आलेला दुमजली पूल सध्या चर्चेत आहे. लवकरच लोकार्पण होणाऱ्या हा दुमजली पूल सुरुवातीला चार मार्गिकेचा असून अचानक दोन मार्गिकेचा करण्यात आला आहे. ही रचना सदोष असून यामुळे अपघात होऊ शकतात असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. अनेकांनी यावरुन इंजिनिअर्स आणि एमएमआरडीएची खिल्ली उडवलेली असतानाच आता एमएमआरडीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीकेला एमएमआरडीने सोशल मीडियावरुनच उत्तर दिलं आहे.
एमएमआरडीने काय म्हटलं आहे?
एमएमआरडीएच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन या व्हायरल झालेल्या उड्डाणपुलाच्या पोस्टपैकी एक शेअर करत उड्डाणपुलाच्या रचनेमागील खरं कारण सांगितलं आहे. “हा फ्लायओव्हर ‘अचानक अरुंद’ होत नाहीये. 4 लेनवरून 2 लेनमध्ये होणारा बदल हा डिझाइनमधील दोष नसून, उपलब्ध रस्त्याच्या रुंदीच्या मर्यादा आणि भविष्यातील नेटवर्क नियोजनावर आधारित आहे,” असं एमएमआरडीने सांगितलं आहे. पुढे यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण देताना, “नियोजनानुसार, फ्लायओव्हरची रचना भाईंदर पूर्वेसाठी दोन लेन आणि भविष्यात भाईंदर पश्चिमेला जोडणाऱ्या दोन लेनसाठी करण्यात आली आहे. अलाइनमेंटनुसार भाईंदर पूर्वेकडील मार्गिका आधी येत असल्याने, सध्या 4-लेनची रचना 2 लेनमध्ये रूपांतरित होताना दिसतेय,” असंही एमएमआरडीने सांगितलं आहे.
ही रचना अधिक परिणामकारक कशी?
“बाहेरील बाजूच्या उर्वरित दोन लेनचे नियोजन पश्चिम रेल्वे मार्गापलीकडे म्हणजेच भाईंदर पश्चिमेकडे भविष्यातील विस्ताराचा भाग म्हणून करण्यात आले आहे. गोल्डन नेस्ट सर्कल येथे पाच प्रमुख रस्ते एकत्र मिळतात आणि वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे, तेथे वाहतूक प्रभावीपणे वितरीत व्हावी या उद्देशाने मेट्रोसोबत एकात्मिक असा 2+2 लेनचा फ्लायओव्हर, दोन्ही बाजूंना स्लिप रोडसह उभारण्यात आला आहे. या जंक्शनच्या पुढे, भाईंदर पूर्वेकडे, विकास आराखड्यानुसार (DP) उपलब्ध जागेची रुंदी कमी होते. त्यानुसार, रेल्वे फाटक रोडकडे अखंड वाहतूक व्हावी या उद्देशाने मध्यभागी 1+1 लेनचा फ्लायओव्हर, समर्पित चढ-उतार मार्गांसह बांधण्यात आला आहे. ही रचना मीरा-भाईंदर प्रदेशातील सर्वात व्यस्त जंक्शनपैकी एकावरून जमिनीवरील मर्यादा लक्षात घेऊन सुरळीतपणे मार्गक्रमण करण्यास सक्षम ठरणार आहे,” असं सविस्तर स्पष्टीकरण एमएमआरडीने दिलं आहे.
भविष्यातील विचार काय?
“भविष्यातील रुंदीकरणासाठी सध्याच्या रचनेच्या माध्मयातून तरतूद करुन ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये पूर्व-पश्चिमेकडील वाहतुकीचं सातत्य सुधारण्यासाठी दोन्ही मार्गिकांवरील फ्लायओव्हरच्या बाहेरील बाजूस अतिरिक्त 1+1 लेनने विस्तार केला जाईल. हा प्रस्ताव सध्या नियोजन टप्प्यात आहे आणि सक्षम प्राधिकरणांकडून मंजुरी मिळाल्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेशी (MBMC) समन्वय साधून हाती घेतला जाईल. सध्या, फ्लायओव्हरची रचना प्रामुख्याने मीरा-भाईंदर परिसरातील वाहतूक अधिक वितरीत व्हावी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आली आहे,” असं एमएमआरडीने म्हटलं आहे.
The flyover does not “suddenly narrow.” The transition from 4 lanes to 2 lanes is not a design flaw, but is based on available road width constraints, and future network planning.
As per planning, the flyover has been designed with two lanes for Bhayander East and future… https://t.co/hZrsBl9SAR
— MMRDA (@MMRDAOfficial) January 27, 2026
सुरक्षेची विशेष काळजी
या उड्डाणपुलाच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचंही एमएमआरडीने म्हटलं आहे. “यामध्ये रंबल स्ट्रिप्स, डिलिनिएटर्स, पुरेशी निर्देशक चिन्हे, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टॅग, दिशादर्शक फलक आणि अँटी-क्रॅश बॅरियर्स यासह आवश्यक सुरक्षा उपाय समाविष्ट करण्यात आले आहेत. फ्लायओव्हर सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यापूर्वी कोणत्याही अतिरिक्त वाहन सुरक्षा उपायांसाठी वाहतूक पोलिसांचे सक्रियपणे मार्गदर्शन घेतले जात आहे,” असंही एमएमआरडीने म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



