
2025 मध्ये गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल, तर गौरी पूजेचा शुभ मुहूर्त 1 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5.59 ते संध्याकाळी 6.43 वाजेपर्यंत आहे. गौरीची पूजा विधी ही मुख्यत्वे भाद्रपद महिन्यात गणपती उत्सवादरम्यान केली जाते, यात गौरीला माहेरी आणून तिची पूजा केली जाते. ओवसा ही नववधूसाठी केली जाणारी एक महत्त्वाची प्रथा आहे, ज्यात ती आपल्या घरात पहिला ‘ओवसा’ भरते.
गौरी आवाहन आणि पूजेचा विधी
गौरी आवाहन: 31 ऑगस्ट 2025 (रविवार)
गौरी पूजन (शुभ मुहूर्त): 1 सप्टेंबर 2025 (सोमवार), पहाटे 5.59 ते संध्याकाळी 6.43 पर्यंत
गौरी विसर्जन: 2 सप्टेंबर 2025 (मंगळवार)
‘ओवसा’ म्हणजे काय?
‘ओवसा’ म्हणजे ओवाळणे. लग्नानंतर ज्या वर्षी गौरी येते, त्या वर्षात घरातील नववधूचा पहिला ओवसा भरण्याची प्रथा कोकण आणि काही प्रांतांमध्ये मोठ्या श्रद्धेने केली जाते. या विधीद्वारे नववधू आपल्या घरी गौरीचे स्वागत करते आणि सौभाग्य प्राप्त करते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. यंदाची गौरी ही पूर्व नक्षत्रात आल्यामुळे सगळीकडे नववधुंच्या पहिल्या ओवसाची लगबग पाहायला मिळते. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो.
ओवसा का भरतात?
ओवसा भरणे म्हणजे ओवसणे, ओवाळणे असा आहे. ओवसा भरणे म्हणजे लग्न झाल्यावर नववधु आपल्या सासरच्या कुळात प्रवेश करते. ती नववधु यापुढे सासरचं कुळ पुढे घेऊन चालणार आहे. यानंतर सासरच्या प्रत्येक सणवारात आणि समारंभात त्या नवीन सुनेला मान सन्मान मिळावा, या उद्देशाने हा ओवसा भरला जातो.
त्याचप्रमाणे गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. गौरीची पुजा अर्चना करून तिच्याकडून आर्शिवाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. तसेच सुप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक असतं. या निमित्ताने ही सुपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते.
पहिला ओवसा कसा भरतात?
ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवासते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. हळदकुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही पाच अथवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई-वडील, सासू-सासरे, काका-काकू, मामा-मामी, दादा-वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, सोने- चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. या पद्धतींमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.