
Maharashtra Politcs 4 MLA To Enter BJP: सोलापूर जिल्ह्यात भारती जनता पार्टीकडून मोठ्या राजकीय खेळीची तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर मध्यरात्री चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे चारही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच या चौघांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा महायुतीमधील भाजपाच्या मित्रपक्षांनाच धक्का असणार आहे.
कोणते आमदार जाणार भाजपामध्ये?
जे आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार आहे त्यामध्ये माजी आमदार बबन शिंदे उपस्थित नव्हते मात्र शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार दिलीप माने या चौघांची फडणवीसांची चर्चा झाली असून हे चौघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधी जिल्हामध्ये पक्षाला बळ देण्यासाठी हे पक्षप्रवेश करुन घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सहकार क्षेत्रातील मोठं नाव भाजपाच्या गळाला
दिलीप माने हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. सोलापूर जिल्हा बँकेचे ते माजी अध्यक्ष असून सोलापूर सहकार क्षेत्रातील मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भाजपच्या साथीने सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिलीप माने गटाची सत्ता आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी दिलीप माने यांचा मोठा प्रभाव आहे.
राजन पाटील आहेत कोण?
राजन पाटील मोहोळचे माजी आमदार असून सहकार महामंडळ ते राज्यमंत्रीपद असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. राजन पाटील हे मोहोळ तालुक्यातील राजकारणातलं मोठं नाव आहे. मोहोळ तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाचे यशवंत माने यांचा अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यामुळे पराभव झाल्यामुळे राजन पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षापासून फरकत घेतली होती.
बबन शिंदे अमेरिकेत घेत आहेत उपचार; मुलाने घेतली फडणवीसांची भेट
बबन शिंदे हे अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून एकेकाळी त्यांची ओळख होती. माढा विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणुकीचे प्रतिनिधित्व केलं आहे. बबन शिंदे यांचं सहकार क्षेत्रातात मोठं योगदान आहे. अकलूज येथील मोहिते पाटलांचा विरोधी गट म्हणून शिंदे घराण्याची ओळख आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुलगा रणजीत सिंह शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजीत पाटील यांच्यासोबत अपक्ष निवडणूक लढवली होती. निवडणुकीत रणजितसिंह शिंदे यांचा 30 हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्यामुळे ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेसाठी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची उपस्थिती होती.
यशवंत माने कोण?
यशवंत माने हे मोहोळचे माजी आमदार आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या पाठिंबावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 2019 साली निवडून आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे अजित पवार पक्षाचे यशवंत माने यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राजू खरे यांनी पराभव केला होता. यशवंत माने हे पुणे जिल्ह्यातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखलं जातं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.