
शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि मकाच्या पडत्या भावाविरोधात भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकत सरकारचा निषेध केला. अखेर, पणनमंत्री जयकुमार रावल यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर साडेतीन तासांपासून सुरू असलेले हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले. शेतमालाच्या भावात होणाऱ्या घसरणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुरणगाव येथून या आंदोलनाची सुरुवात झाली. बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टिअरिंग हातात घेत रॅलीचे नेतृत्व केले. शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकताच वातावरण अधिकच तापले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात कांद्यांची फेक केली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, यावेळी येवल्यात प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांच्या जेवणाच्या पंगती बसल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या खिचडीचा आंदोलक शेतकऱ्यांनी आस्वाद घेतला. साडेतीन तास ठिय्या आणि ९ मागण्यांचा तगादा बच्चू कडू यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात तब्बल साडेतीन तास ठाण मांडून बसत प्रशासनाला धारेवर धरले. कांदा आणि मक्याला हमीभाव मिळावा, ‘भावांतर योजना’ तातडीने लागू करावी, यासह शेतकऱ्यांच्या ९ प्रमुख मागण्यांवर ते ठाम होते. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मंत्र्यांचे लेखी आश्वासन अन् मुख्यमंत्र्यांची बैठक आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. उद्याच (मंगळवारी) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मंत्र्यांच्या लेटरहेडवर देण्यात आले. हे पत्र मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. …तर अधिकाऱ्यांना बसायला जागाही उरणार नाही! आंदोलन मागे घेताना बच्चू कडू यांनी सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सध्या आम्ही केवळ कार्यालयाबाहेर कांदे फेकले आहेत. पण जर आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर संपूर्ण प्रांताधिकारी कार्यालय आम्ही कांद्याने भरून टाकू. मग अधिकाऱ्यांना आत बसण्यासाठी जागाही उरणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



