
Travel Places Konkan : पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्राकडे पाहिल्यास या राज्याच्या वैभवसंपन्न भूमीत दडलेली कैक रत्न डोळ्यांसमोर येतात. कोकण त्यापैकीच एक. निसर्गसौंदर्य, कोकणातील एकंदर संस्कृती पाहिली असता कुठं जाऊन निवांत क्षण व्यतीत करायचे झाल्यास कोकण हाच उत्तम पर्याय असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
आता कोकण म्हणजे काय? तारकर्ली, वेंगुर्ला, सावंतवाडी… अहं… त्यापलिकडेसुद्धा कोकणातील काही ठिकाणं अशी आहेत जिथं सध्यातरी तुलनेनं पर्यटकांची गर्दी कमी दिसते. हे कोकण कमाल नजर असणाऱ्यांनाच सापडतं. अशा या कोकणातील अवाक् करणारं आणि अद्वितीय सौंदर्य लाभलेलं ठिकाण म्हणजे देवघळी. रत्नागिरीला गेलं असता तिथून 41.9 किमी अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आल्यावर त्याच्यापुढं मालदिवही फिका पडेल असंच अनेकजण म्हणतील.
कुठे आहे हा समुद्रकिनारा?
देवघळी समुद्रकिनारा (Devghali Beach) हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी (Kasheli) गावाजवळ आहे. हा एक शांत, स्वच्छ असा समुद्रकिनारा असून, ही निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठीची एक उत्तम जागा आहे.
देवघळीच्या सौंदर्याचं कौतुक कराल तितकं कमी…
देवघळी किनारा तीन बाजूंनी डोंगरकड्यांनी वेढला असून, इथं समुद्राच्या लाटांबरोबर वाळूवर चालताना निसर्गाच्या शांततेचा अनुभव मिळतो. येथे गर्दी कमी असते, त्यामुळे शांततेचा मनमुराद आनंद घेता येतो. किनाऱ्याजवळ असलेल्या टेबल व्ह्यू पॉईंटवरून अर्थात एका टेकडीवरून तुम्हाला उंचावरून संपूर्ण किनाऱ्याचं विहंगम दृश्य टीपता येतं.
देवघळी किनाऱ्यावर निवांत वेळ घालवल्यानंतर, अथांग समुद्राचं एक अनपेक्षित रुप आणि त्या फेसाळणाऱ्या लाटा पाहिल्यानंतर तिथंच काही मिनिटांच्या अंतरावर, कशेळी गावात कानकादित्य मंदिर आहे. हे सूर्यदेवाचं एक प्राचीन मंदिर असून सुमारे 800 वर्षे जुनं असल्याचं सांगण्यात येतं. या मंदिरात सूर्याची काळ्या पाषाणात कोरलेली आणि सोनेरी अलंकार असलेली मूर्ती आहे.
देवघळीपर्यंत कसं पोहोचायचं?
रस्ते मार्गानं…(By Road)
रत्नागिरी शहरापासून सुमारे 40-41 किमी अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी स्वत:ची गाडी किंवा कॅब नेणं उत्तम.
रेल्वेनं…
रेल्वे मार्गानं इथं पोहोचायचं झाल्यास जवळचं स्थानक: कुडाळ किंवा रत्नागिरी. तिथून पुढं टॅक्सी किंवा बसने प्रवास करता येतो.
FAQ
देवघळी समुद्रकिनारा कोठे आहे?
देवघळी समुद्रकिनारा (Devghali Beach) हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी (Kasheli) गावाजवळ आहे. तो रत्नागिरी शहरापासून सुमारे 41.9 किमी अंतरावर आहे.
देवघळी समुद्रकिनाऱ्याची खासियत काय आहे?
हा किनारा तीन बाजूंनी डोंगरकड्यांनी वेढलेला, शांत आणि स्वच्छ आहे. येथे पर्यटकांची गर्दी कमी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवता येतो. टेबल व्ह्यू पॉइंटवरून किनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहता येते, आणि समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांसह वाळूवर चालण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.
देवघळी समुद्रकिनाऱ्याजवळ कोणती पर्यटन स्थळे आहेत?
किनाऱ्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर कशेळी गावात कानकादित्य मंदिर आहे. हे 800 वर्षे जुनं सूर्यदेवाचे प्राचीन मंदिर असून, येथे सूर्याची काळ्या पाषाणातील सोनेरी अलंकारांनी सजलेली मूर्ती आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



