
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी पुणे महानगरपालिकेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधी तरतुदीबद्दल महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. संयोजक विठ्ठल गायकवाड आणि लता राजगुरू यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी कार्य केले. प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुण्यातील सर्व जनतेचा विकास व्हावा, हाच आमचा सामूहिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागपुरे पुढे म्हणाल्या की, सामाजिक कार्य करताना कौतुक स्वीकारणे योग्य वाटत नाही. समाजहितासाठी कार्य करत राहावे याच भावनेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कर्तव्याच्या भावनेतूनच स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, लोकशाहीच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा असतो. महापौर आणि उपमहापौर याच भूमिकेतून वाटचाल करत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीतील विकासाचे पर्व महत्त्वाचे ठरणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या, कष्टप्रद जीवन जगणाऱ्या कुटुंबातून मी आलो आहे. माझीही वाटचाल कष्टातूनच झाली आहे. भविष्यातील वाटचाल सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठीच राहणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले की, स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. कर्तव्याच्या भावनेतूनच कार्य करत राहणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




