
गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या मला देऊ नका. हा देश तुरुंगात जाऊन जाऊन स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे मला तुरुंगात जाण्याची भीती नाही. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, असे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी म्हटले आहे. राजकीय
.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट स्टडी सेंटर यांच्या वतीने ‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर एक दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना निरंजन टकले बोलत होते.
…म्हणून मुस्लीम हा शत्रू दाखवायचा आहे
निरंजन टकले म्हणाले, 13 वर्षांअगोदर चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता, पण आता कबर, मशीद, मंदिराखाली काय आहे, याचा शोध घेतला जातोय. मनुवादाचे आक्रमण होत आहे, हे समजू नये यासाठी मुस्लीम हा शत्रू दाखवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चुकीचे विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला संरक्षण देण्यात आले, पण जेव्हा निरंजन टकले म्हणतात मुख्यमंत्री खोटारडा आहे, तर त्यावर मात्र गुन्हा दाखल केला जातो.
गद्दार शब्दांवर आमचाच हक्क असल्याचे काहींनी सिद्ध केले
फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन असल्याशिवाय लोकशाही राहूच शकत नाही. मला काय वाटते?, माझा मनात काय प्रश्न आहेत? मला काय सुचतंय? हे बोलूच शकलो नाही, तर लोकशाही उरते कुठे? असा सवाल निरंजन टकले यांनी यावेळी उपस्थित केला. कुणाल कामराने गायलेल्या विडंबन गीतामध्ये कुठेही कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. कुणालने आपल्या गीतात गद्दार, रिक्षावाला, गाडीवाला असे वर्णन केले आहे, त्या वर्णनाप्रमाणे अनेक रिक्षावाले आहेत. पण गद्दार या शब्दावर आमचाच हक्क आहे. हे त्यांनी सिद्ध केले, असे म्हणत निरंजन टकले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
आम्ही बोलल्यास यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही
निरंजन टकले पुढे म्हणाले, 23 फेब्रुवारीला मी विद्रोही साहित्य संमेलनात केलेल्या भाषणावरून 25 मार्चला माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टात जे स्टेटमेंट दिले त्यात मी स्पष्ट सांगितले की, मी काहीही चुकीचे बोललो नाही. हे मी ठरवून बोललो. हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. या बाबतीत मी कोणाचा ही मोहताज नाही. मनोहर कुलकर्णी, नितेश राणे त्यांनी काहीही बोलावे, तेव्हा त्यांना चालते. महात्मा फुलेंना देशद्रोही बोलतात, तेव्हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे बोलले जाते. पण जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही.
फडणवीसही टीका करूनच मुख्यमंत्री झाले
राजकीय पक्षांवर टीका का नाही करायची? असा सवाल निरंजन टकले यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे देखील तुकाराम महाराजांची भजने म्हणून नाही, तर राजकीय पक्षांवर टीका करूनच मुख्यमंत्री झालेत, असा घणाघात निरंजन टकले यांनी केला. राजकीय नेता म्हणून टीका करायची नसेल, तर ते त्यांच्या बायकोच्या ऑर्केस्ट्राची तिकीटे विकायला लावतात, हे तुम्हाला बोलता येत नसेल, तर मला बोलू द्या. गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या मला देऊ नका. हा देश तुरुंगात जाऊन जाऊन स्वतंत्र झाला आहे. तुरुंगात जाण्याची भीती मला नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आंबेडकरांनी दिले आहे, असेही ते म्हणाले.
ढसाळांबाबत माहीत नाही, सेन्सॉर बोर्डात कोण आहेत? याचा अंदाज येतो
निरंजन टकले म्हणाले, काही दिवसांपूर्वी ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध मराठी कवी, लेखक आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्याने वाद निर्माण झाला असून हे प्रकरण सेन्सॉर बोर्डाकडे गेले आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाने कोण नामदेव ढसाळ? असा संतापजनक सवाल उपस्थित केला होता. ज्यांच्या कविता एनसीआरटी, मराठी साहित्य, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाचा भाग आहेत, ते नामदेव धसाळ सेन्सॉर बोर्डला माहीत नाहीत. यावरून अंदाज लावू शकता की, सेन्सॉर बोर्डामध्ये कोण आहे.
… त्यामुळे फुले चित्रपटाला सेन्सॉरने कात्री लावली
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित ‘फुले’या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. यावरही निरंजन टकले यांनी भाष्य केले. जे दृश्य दाखवले ते नाही, जे शेण फेकले ते घृणास्पद होते. फुले चित्रपट हा हिंदीमध्ये प्रदर्शित होत असल्याने तो अनेक राज्यांमध्ये पाहिला जाईल. त्यामुळे काही वाक्य आणि शब्द बदलण्यास सांगितले, असा आरोप टकले यांनी सेन्सॉर बोर्डावर केला. ”तीन हजार साल की गुलामी से मैं लढ रहा हूँ” यामध्ये ‘तीन हजार साल’ या शब्दाचा जागी ‘कई साल’ वापरले गेले. कारण तीन हजार साल म्हणजे मनुवाद, असे टकले म्हणाले.
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, तेव्हा अमेरिकेतील महाविद्यालयामध्ये या विषयावर चर्चा सुरु असेल की, अंतराळात सुनीता विल्यम्स यांची मनस्थिती काय होती, इच्छा शक्ती काय होती. नासाचे यान काम नाही करू शकले, तेव्हा इलोन मस्क यांनी पाठवलेल्या यानातून सगळ्यांना सुखरूप आणले. पण याच दिवशी महाराष्ट्रातील मुले औरंगजेबाच्या कबरीचे काय करायचे यावर चर्चा करत होते, असे निरंजन टकले म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.