
Shiv Sena UBT Claims One Rajya Sabha Seat: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यसभेतील शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, भागवत कराड या नेत्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. या 7 जागांसाठीच्या निवडणुका 16 मार्च 2026 रोजी होणार आहेत आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे. दरम्यान राज्यसभेच्या एका जागेवरून मविआत विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यसभेतील एक जागा शिवसेना UBT पक्षाची आहे असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
राज्यसभेच्या जागेवरून मविआत विसंवाद
पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआकडे राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि शिवसेना UBTचे 20 अशा तीन पक्षांचे मिळून 46 आमदारांचे संख्याबळ असून, इतर पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. तरी एक उमेदवार निवडून येण्यासाठी 41.5 मतांचा कोटा आवश्यक आहे. आता ही एक जागा मविआतील तीन पक्षांपैकी कोणाला द्यायची यावर मविआमध्ये विसंवाद पाहायला मिळत आहे. ही जागा शिवसेना UBTची आहे असा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे.
राज्यसभेच्या एका जागेवर शिवसेना UBTचा दावा
दरम्यान शरद पवार पुन्हा राज्यसभेवर येणार अशी चर्चा होती. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी “शरद पवार यांच्या जागेबाबत अजून कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. हे आम्ही फक्त माध्यमांद्वारे ऐकले आहे. पण ही जागा आत्तातरी शिवसेना UBT ची आहे. पक्षाच्या संख्याबळावर महाविकास आघाडीमध्ये यावेळेला दोन्ही ठिकाणी शिवसेना UBTची जागा आहे.” असा दावा केला आहे.
नक्की वाचा>>>महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर! पवार कुटुंबातील आजोबा- नातू एकाचवेळी राज्यसभेवर?
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांना राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा असल्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता “पुढच्या आठवड्यात महाविकास आघाडीची अधिकृत बैठक झाल्यानंतर, तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात येईल” असे म्हटले. तसेच “याबाबत जो काही निर्णय होईल तो महाविकास आघाडीचा एकत्रित निर्णय असेल” असेही त्यांनी सांगितले आहे.
आशिष शेलार यांची मविआवर खोचक टिका
दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “याबाबतची पूर्ण माहिती त्या त्या पक्षाची माहिती समोर आल्यावर देता येईल. पण एक गोष्ट महाराष्ट्राला कळून चुकली आहे, आम्ही ती वारंवार सांगत होतो हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत, स्वार्थासाठी एकमेकांचा राजकीय जीव सुद्धा घेतील. हे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमध्ये दिसून येते.” अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
तसेच 16 मार्च रोजी 2026 रोजी होणारी निवडणूक महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या आधिक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान राज्यसभेच्या या निवडणुकांसाठी मविआकडून शरद पवार हे एकमेव उमेदवार असल्याच्या चर्चेला आदित्य ठाकरे यांनी अफवा ठरवल्यानंतर, आता ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



