
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे, या पावसामुळे काही
.
आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्या भागांत पावसाचा जोर आहे, ते पाहूया.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची स्थिती
पुणे जिल्ह्यात, विशेषतः शहर आणि दौंड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले असून मसनरवाडी परिसरातील मेरगळमळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने स्थानिक रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून काही गावकऱ्यांनी आपली घरे सुरक्षित ठेवण्यासाठी वड्यांच्या आजूबाजील झाडे-झुडपे काढून टाकली आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक ठप्प
गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात सतत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या या तांडवात महामार्गावरून एक इनोवा गाडी वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अनेक जिल्ह्यांत शेती आणि जनजीवनावर परिणाम
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रचंड प्रभाव दिसून येत आहे. यामुळे शेती, वाहतूक आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. काही भागांत पिकांचे नुकसान तर कुठे जनावरांवर आपत्ती कोसळली आहे. पाहूया राज्यातील विविध जिल्ह्यांतील पावसाची स्थिती.
पालघर जिल्हा – भातशेतीचे मोठे नुकसान
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. आजही पहाटेपासून पावसाने जोर धरला असून याचा मोठा फटका उन्हाळी भातशेतीला बसत आहे. आतापर्यंत अंदाजे 55 ते 60 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये भातशेती, वीट भट्टीसह इतर क्षेत्रांचाही समावेश आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्हा – सर्व तालुक्यांत पावसाची हजेरी
बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीला रिमझिम स्वरूपाचा असलेला पाऊस आता मुसळधार होत चालला आहे. बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि चिखली तालुक्यांत दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी, अनेक भागांत रस्ते आणि गल्ली बोळांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
वाशिम जिल्हा – वादळी पावसाने गोठा उडून गेला
वाशिम जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिंपळगाव येथील शेतकरी राहुल दंडे यांच्या जनावरांचा गोठा वाऱ्यामुळे उडून गेला असून चारा आणि खाद्यसाठाही भिजून खराब झाला आहे. गोठा कोसळल्यामुळे काही जनावरे जखमी झाल्याची माहिती आहे.
सोलापूर जिल्हा – उजनी धरणात 4 टीएमसीने वाढ
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पावसाची बॅटिंग सुरू आहे. यामुळे चंद्रभागेची पाण्याची पातळी एक मीटरने वाढली आहे. पंढरपूरसाठी 25 जूनपर्यंत पुरेसा पाणीसाठा बंधाऱ्यात तयार झाला आहे. उजनी धरणात चार टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दहा दिवसांत 171 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्हा – कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो
सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. निसरे, तांबवे बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागले असून खोडशी डॅमही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या या पावसामुळे पाणीसाठ्यांमध्ये वाढ होत असली तरी शेती आणि ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. प्रशासन आणि हवामान विभाग सतर्क असून पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.