
Raj Thackeray React On Devendra Fadnavis Comment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रपरिषदेत राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे शैक्षणिक अभ्यास क्रमातील हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन आदेश रद्द करीत असल्याची घोषणा केली. एकूणच त्रिभाषा सूत्रासंदर्भात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करीत असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. या वेळी फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्राचा निर्णय हा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घेतला होता आणि त्यांच्याच काळात घेतला गेला, याचा संपूर्ण घटनाक्रम पुराव्यानिशी सांगितला आणि राज ठाकरेंनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडे विचारणा करावी असंही म्हटलं होतं. आता यावरच राज ठाकरेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
फडणवीस काय म्हणाले?
“विरोधक म्हणतात, त्रिभाषा सूत्राचा अहवाल आम्ही स्वीकारला. तो स्वीकारावाच लागतो. पण, आम्ही तो लागू केला नाही. तेही समजून घ्या. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यावर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. 7 जानेवारी 2022 रोजी त्याचे इतिवृत्त कायम केले गेले. डॉ. माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर करण्यात आला. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कार्यगट स्थापन आणि समितीच्या शिफारसीनुसार तीन टप्प्यात प्रस्तावित कार्यवाहीस मान्यता दिली गेली. या इतिवृत्तावर सही तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. म्हणजे त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी मंत्रिमंडळ बैठक 20 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेत झालेली,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“आताही आम्ही एक बैठक 23 जूनला घेतली. त्यात स्पष्ट केले की, साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व घटकांशी चर्चा करुन आणखी काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घेऊ. दादा भुसेंवर जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ती प्रक्रिया सुरु केली,” असं फडणवीस म्हणाले. हे सर्व सांगून झाल्यानंतर फडणवीसांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी याबाबत उद्धव यांच्याकडे विचारणा करावी असं म्हटल्याचा संदर्भ राज ठाकरेंना आजच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने दिला आणि प्रश्न विचारला.
नक्की वाचा >> ठाकरे एकत्र येणार! राज यांनीच दिली मनसे-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्याची माहिती; तारीखही सांगितली
फडणवीसांच्या या विधानावर राज ठाकरेंचं उत्तर
उद्धव ठाकरेंनी आधी त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं आणि याबद्दल फडणवीसांनी उद्धव यांनी राज यांना विचारावं असं म्हटलेलं, असा संदर्भ देत प्रश्न विचारला. या प्रश्नावर राज ठाकरेंनी, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्र, मराठी भाषेविरोधात आणि मराठी माणसाच्या बाबतीत कोणीही जरी असेल तर माझा त्याला विरोध असेल,” असं स्पष्टपणे सांगितलं. तसेच, “उद्धव ठाकरेंच्या कालावधीमधील निर्णयाबद्दलची माहिती मला अजून मिळालेली नाही. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याला माझी हीच विनंती आहे की मराठी, महाराष्ट्र, मराठी भाषा या विषयावर कोणतीही तडजोड होता कामा नये. आमच्याकडून तर होणारच नाही. यापुढे सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूंनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरु आहेत. हे थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसाने आजूबाजूला काय घडतं याबद्दल सतर्क राहणं गरजेचं आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.