
Maharashtra Politics BJP Slams Raj Thackeray: शिवसेना पक्षाचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आणि वरिष्ठ नेत्यांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. मात्र राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टवरुन भारतीय जनता पार्टीने आता राज ठाकरेंवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
राज ठाकरेंनी भाजपाला लगावला टोला
बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना भावपूर्ण शब्दांमध्ये आदरांजली वाहताना भारतीय जनता पार्टीचा थेट उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊटंवरुन केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांसोबतचा एक फोटो जोडला आहे. “शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही,” असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर…
“बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही! फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी काकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता… pic.twitter.com/Z223LMW51S
— Raj Thackeray (@RajThackeray) November 17, 2025
राज ठाकरेंचं नाव घेत भाजपाचं उत्तर
थेट भाजपाचं नाव घेऊन राज ठाकरेंनी निशाणा साधल्यानंतर भाजपानेही या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या पोस्टवरुन प्रश्न विचारला. यावर बन यांनी, “बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतांचं राजकारण केलं नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका साकारली म्हणून त्यांचा मतांचा टक्का वाढला,” असं उत्तर दिले. पुढे बोलताना बन यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला. “राज ठाकरेंना स्मृतीभंश झाला आहे. पहिल्यांदा हिंदू म्हणून मत दिलं पहिजे हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंसोबत गेल्याने राज ठाकरे आपली भूमिका बदलत आहेत,” असं बन म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



