
Eknath Shinde Shivsena Vs Raj Thakeray: मराठा समाजाच्या 8 पैकी 6 मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण केल्यानंतर मुंबईत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी केली. यानंतर राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मात्र या आंदोलनच्या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळी विधानं केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. मात्र मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य होण्याच्या काही तास आधीच एकनाथ शिंदेंच्या आमदाराने थेट राज ठाकरेंना आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले?
मराठा आरक्षणासंदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उपममुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच तुम्हाला याचं उत्तर देऊ शकतात असं म्हटलं. मागील वेळेस एकनाथ शिंदे यांनी आधी मराठा आंदोलनास भेट दिली होती. नवी मुंबईत त्यांनी मराठा आंदोलकांना आरक्षणासंदर्भात शब्द दिला असताना मराठा आंदोलक मुंबईत परत का आले असा सवाल केला होता. राज ठाकरेंच्या या विधानाने या विषयाला नवीन फाटा फुटला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन जरांगेंनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.
शिवसेनेच्या आमदाराने काय टोला लगावला?
मनसे अध्यक्षांच्या या वादावरुन बुधवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट राज ठाकरेंना लोकांमधून निवडून येऊन दाखवावं असं आवाहन दिलं आहे. “राज साहेब ठाकरे यांना आरक्षण बदल खूप काही माहिती नाही. आधी त्यांनी लोकप्रतिनिधी व्हावे मग आरक्षण बद्दल कसं असतंय हे बघावे,” असा टोला भोंडेकर यांनी लगावला आहे. भोंडेकर हे भंडाऱ्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत.
राज आणि शिंदेंमध्ये दुरावा?
राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांचं विधान हे राजकीय दृष्टीकोनातून वेगवेगळ्या अर्थाने पाहण्यात आलं. मात्र या विधानामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत असा निष्कर्षही काही जणांनी काढला. आता भोंडेकरांच्या टीकेला मनसे काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
FAQ
मराठा आंदोलनादरम्यान कोणत्या राजकीय नेत्यांमधील वाद चर्चेत आला?
मराठा आंदोलनादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील वाद चर्चेत आला. याशिवाय, शिंदे गटाच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही राज ठाकरेंवर टीका केली.
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काय विधान केलं?
राज ठाकरे यांना मराठा आरक्षणाबाबत विचारलं असता, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच उत्तर मागितलं. त्यांनी म्हटलं की, शिंदे यांनी मागील वेळी नवी मुंबईत मराठा आंदोलकांना आरक्षणाचा शब्द दिला होता, मग आंदोलक पुन्हा मुंबईत का आले?
या टीकेला मनसे कसं उत्तर देईल?
नरेंद्र भोंडेकर यांच्या टीकेला मनसे काय उत्तर देईल हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



