
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची राज यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर भेट झाली. या भेटीनं राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना जवळ करुन उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केलं आहे. शिवाय भाजपशी वाटाघाटी करताना स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्नही केला आहे. भाजपच्या दबावतंत्राला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही खेळी केल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत माहीमच्या रणसंग्रामामुळं शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण झाला होता. पण मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळं दोन्ही पक्षात आलेली कटूता कमी झाल्याची चर्चा सुरु झाली. पण ही भेट फक्त कटुतेपर्यंतच मर्यादित नव्हती.
शिवसेनेतल्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंना शिवसेना महायुतीत घेण्यासाठी उत्सुक आहे. बीएमसी निवडणुकीत मनसे शिवसेनेच्या कोट्यातील जागा लढवणार. मनसेच्या सोबतीमुळं शिवसेनेला जागावाटपाच्या वाटाघाटीत बळ मिळू शकतं. भाजपच्या दबावतंत्राला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची रणनिती आखलेली असू शकते. राज ठाकरेंमुळं उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्येही फूट पडेल असा अंदाज आहे.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र कोणत्याही राजकीय चर्चांचा इन्कार केला. मात्र चर्चेत बाळासाहेबांच्या आठवणी निघाल्याचं दोन्ही पक्षातील नेते सांगायला विसरले नाहीत.
विधानसभा निवडणुकीनंतर राहिलेली भेट मंगळवारी झाल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं. पण चर्चेचा विषय बाळासाहेब ठाकरे होता हे सांगण्यासाठी ते विसरले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या भेटीवर खास त्यांच्या शैलीतून भाष्य केलं आहे.
राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्या भेटीतून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम विरोधकांनी सुरु केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अवघ्य़ा काही तासानंतर उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेऊन चर्चा केली. एकिकडं नवे मित्र जोडायचे दुसरीकडं सरकारच्या डोक्याला ताप होतील असे मुद्दे काढून सरकारलाच खिंडीत गाठण्याची शिवसेनेची रणनिती नाही ना अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.