
Nitesh Rane Vs Nilesh Rane: माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र आमने-सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांना भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच राज्यातील मंत्री नितेश राणेंनी जाहीरपणे एक खोचक सल्ला दिला आहे. नितेश राणेंनी एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत, ‘आपण याची नोंद घ्याल अशी अपेक्षा’ असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच थोरल्याने दिलेला सल्ला
राणे बंधूंपैकी धाटक्या भावाने थोरल्याला सबुरीचा सल्ला दिल्ला आहे. या निमित्ताने राणे बंधूमध्ये पुन्हा एकदा ट्विट वॉर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी ट्विट करुन मंत्री नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या मित्र पक्षातील पदाधिकाऱ्याला धमाकावनं बरं नव्हे आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो, अशा आशयाची पोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका लढविण्यावरून कुडाळ मतदारसंघात धुसपूस सुरु असल्याची सूत्रांची माहिती असून याच पार्श्वभूमीवर धाटक्या भावाने थोरल्या भावाला सूचक इशारा दिलाय.
नितेश राणे मोठ्या भावाला काय म्हणाले?
“आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसाअगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकवणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो,” असं म्हणत नितेश राणेंनी निलेश राणेंना टॅग करुन एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
या स्क्रीनशॉटमध्ये काय आहे?
‘राणे निलेश व्हिआयपी न्यू’ या नावाने सेव्ह करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटवर समोरुन ‘नको ती स्टेटमेंट देऊ नका. अंगाशी येईल तुमच्या. नंतर वाचवायला कोणी येणार नाही,’ असा मेसेज आल्याचं दिसत आहे. त्यावर ‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपा महायुतीने लढणार; रणजित देसाई’ अशा मथळ्याखालील युट्यूब व्हिडीओची लिंक फॉरवर्ड करत रिप्लाय देण्यात आल्याचं स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय. त्यावर, “अजून मी संयम ठेऊन आहे,” असा रिप्लाय देण्यात आल्याचं दिसतंय.
आदरणीय निलेशजी ,
आपणच काही दिवसा अगोधर महायुती बदल बोलला होता..
आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारी ला धमकवणे बरोबर नाही..
शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत..
आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो @meNeeleshNRane pic.twitter.com/iMcMSTQVh3— Nitesh Rane (@NiteshNRane) June 18, 2025
राणे कुटुंबात कटुता?
सध्या हा स्क्रीनशॉट चर्चेचा विषय ठरत असून राणेंच्या घरात एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेचा असून दुसरा भाजपाचा आहे. नारायण राणे हे स्वत: भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळेच आता राजकीय मतभेद कुटुंबात कटुता निर्माण करणार नाहीत ना? अशी चिंता राणे समर्थकांना लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.