
गँगस्टर नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडलेत. त्यांचे वडील रामदास कदम यांनी एका बड्या व्यक्तीच्या सूचनेनुसार योगेश यांनी हा निर्णय घेतल्याचे नमूद करत या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढवला आह
.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर पुण्यातील फरार गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर योगेश यांचे वडील तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी स्वतः पुढे येत योगेश यांनी विधिमंडळातील एका उच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीच्या सूचनेनुसार नीलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे गृहराज्यमंत्र्यांना सूचना करणारा हा व्यक्ती कोण? याविषयी खमंग चर्चा रंगली असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना या व्यक्तीचे नाव घेण्याचे आव्हान दिले आहे.
रामदास कदम मोघम बोलू नका
सुषमा अंधारे म्हणाल्या, रामदास कदम मोघम बोलू नका. योगेश कदम यांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कुणी शिफारस केली होती? नेमके कुणी आदेश दिले होते? हे जरा स्पष्ट बोला ना. ज्याचे नाव घ्यायचे असेल त्याचे स्पष्ट नाव घ्या. उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडले आहेत. गृहराज्यमंत्र्यांना दुसराच कुणीतरी आदेश देत असेल, तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा केवळ गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का? त्यांना कुणी आदेश दिले, त्याचे नाव घेण्याची हिम्मत आत्ताही तुमच्यात नाही. याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात प्रोटेक्शन नाही का? तुम्हाला भीती वाटत आहे का?
तुम्ही इतके घाबरट आहात आणि तुमच्या मुलाला अडचणीत आणण्याचा आदेश देण्याइतपत जी माणसे आहेत, ज्यांची नावे सुद्धा तुम्ही घेऊ शकत नसाल, तर तुम्ही बाळासाहेबांचा विचार व तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक कसे काय म्हणवून घेता? रामदास कदम जे बोलायचे ते उघडपणे बोला. नाव घेऊन बोला. हिम्मत असेल तर निश्चितपणे तो माणूस भाजपचा आहे की शिंदेंचा आहे की अजून कुणाचा आहे हे तुम्ही नाव घेऊन सांगितले पाहिजे.
रामदास कदम मोघम बोलू नका. हिम्मत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले त्याचे थेट नाव घ्या… आणि हे सुद्धा मान्य करा की योगेश कदम जर दुसऱ्यांच्या आदेशावरून काम करत असतील तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला होते खरंतर एक मुका बाहुला तिथे बसवलेला होता, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. आता पाहू नेमके काय म्हणाले होते रामदास कदम?
रामदास कदम अनिल परब यांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले होते, योगेश कदम राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. मंत्री म्हणून त्यांना काही अधिकार असतात. एखाद्यावर एकही केस नाही, असे त्यांचे समाधान झाले आणि संबंधित शिक्षक किंवा बिल्डर असेल अथवा कोर्टाने त्याला क्लीनचिट दिली असेल, तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. ते तुला (अनिल परब) व तुझ्या बापाला विचारून निर्णय घेणार नाहीत.
योगेश कदम यांनी विधिमंडळातील एका बड्या व्यक्तीच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला. हा व्यक्ती मंत्र्यांनाही आदेश देतो. हा व्यक्तीही न्यायाधीशच आहे. त्यामुळे योगेश कदम यांनी निर्णय घेतला. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. ती मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्याने शिफारस केल्यानंतर, त्याच्या दृष्टीने ही व्यक्ती स्वच्छ असेल असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.