
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्याचे पडसाद आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आता पक्षाच्या महिला संघटनेतूनच त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र, नाशिकमधील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र लिहून त्यांना या पदावरून तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी ही मागणी पुढे नेत, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या पुरोगामी चेहऱ्यावर डाग लागल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. रुपाली पाटील सुनेत्रा पवार यांची भेट घेणार दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि संताप त्या या भेटीत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. चाकणकर यांच्या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी ठोंबरे करणार असल्याचे समजते. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील चर्चेत या प्रकरणामुळे पक्षातील महिलांमध्ये अस्वस्थता वाढली असून काही ठिकाणी महिलांनी राजीनामे दिल्याचीही माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. पक्षात महिलांची संख्या आणि सहभाग महत्त्वाचा असताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, अशी भूमिका महिला पदाधिकाऱ्यांकडून मांडली जात आहे. पक्षांतर्गत विरोधही उघडपणे समोर अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रुपाली चाकणकर यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी कठीण बनत आहे. एका बाजूला विरोधकांकडून टीका होत असताना आता पक्षांतर्गत विरोधही उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्ष नेतृत्व या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



