
डोंबिवलीच्या एका रिलस्टारनं दोन महिलांवर अत्याचार केला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र त्याचे इतरही गुन्हेगारी कारनामे आता समोर आलेत. कोण आहे हा रिलस्टार आणि त्याने काय प्रताप केलेत पाहुयात.
2 बलात्कार प्रकरणातील रिलस्टार अटकेत
नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
ठाण्यातील घटस्फोटीतेवर रिलस्टारचे अत्याचार
डोंबिवलीतील दोन बलात्कार प्रकरणांत फरार असलेला आणि सोशल मीडियावर ‘रिल स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्र पांडुरंग पाटीलला अखेर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. त्याच्यावर मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे 2 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांची पाच पथकं त्याच्या मागावर होती.
– सुरेंद्र पाटीलनं इन्स्ट्राग्रामवर पुण्यातील एअर होस्टेस राहिलेल्या १९ वर्षीय तरुणीशी मैत्री केली
– तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी देण्याचं दाखवत मुंबईला बोलावलं.
– बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर 2 वेळा अत्याचार केले
दुसरीकडे डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात एका घटस्फोटीत महिलेनं सुरेंद्र पाटीलविरोधात तक्रार केली होती. पीडित महिला सुरेंद्रच्या गाळ्यात व्यवसाय करायची. तिचं थकीत भाडं माफ करण्यासाठी आणि महिलेला द्रोण आणि कागदी प्लेट बनवण्याची मशीन परत देण्याच्या बहाण्यानं सुरेंद्र पाटीलनं पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे या कुख्यात रिलस्टार सुरेंद्र पाटीलविरोधात याआधीही कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, वीज चोरी, अवैधरित्या घातक शस्त्र, बंदूक बाळगणं असे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. याआधी पोलिसांनी त्याला दीड वर्ष तडीपारही केलं होतं. मात्र त्यानं न्यायालयातून तडीपारी रद्द करुन घेतली आणि मोकाट फिरु लागला.
काही महिन्यांपूर्वी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या खुर्चीवर बसून रिल बनवल्यानं सुरेंद्र पाटील चर्चेत आला होता. मात्र इतके गुन्हे असलेला हा सुरेंद्र पाटील रिलस्टार म्हणून नावारुपाला येतो. तडीपार होऊनही राजरोसपणे समाजात वावरतो, बंदुकीच्या धाकानं महिलांवर अत्याचार करतो यावरुन न्यायव्यवस्थेचे हात अशा गुन्हेगाराला योग्य शिक्षा देण्यासाठी किती तोकडे पडतेय हे दाखवतेय. किमान आतातरी या कुख्यात रिलस्टारला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल हीच अपेक्षा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.