
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-वडसा मार्गावरील सोनी-चपराड दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात चार युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 18) सायंकाळी सोनी-चपराड मार्गावरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांची आपापसात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवरील तरुण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले आहेत. त्यात प्रफुल रामकृष्ण भानारकर (25, रा. मोहरणा) आणि अतिश नरेश सुखदेवे (24, रा. सोनी) तर किरकोळ जखमी मध्ये मंगेश रमेश भानारकर आणि क्षितिज रामटेके यांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून सर्व जखमींना तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रफुल भानारकर आणि अतिश सुखदेवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक उपचार केल्यानंतर या दोघांनाही तातडीने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य दोन युवक किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



