
Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचं लहान स्वरुप आणि स्थानिक राजकारणावर प्रचंड प्रभाव पाडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीक्षेपात आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, मातब्बर नेतेसुद्धा नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
पक्षाची मोर्चेबांधणी, नेत्यांची पक्षांतरं आणि या साऱ्यामध्ये श्रेयवादसुद्धा डोकं वर काढताना दिसत असून, विधानसभा निवडणुकीप्रमाणंच नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु झाली असून पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.
‘लाडकी बहीण योजना ही माझीच संकल्पना…’
‘ही लाडकी बहीण योजना केलेली आहे, ही माझी संकल्पना आहे. या लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलेलं आहे. यांनीच आम्हाला मंत्री केलं आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. परळीतील एका सभेत आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबद्दल कानावर घातलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
‘लाडकी बहीण योजनेमुळे मध्य प्रदेशांनंतर राज्यात सत्ता आली. त्यामुळं ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही. कारण ती कोणाचही घेतलेलं कधी विसरत नाही. मी पालक आहे तुमची.. संपर्क मंत्री आहे बीडची…माझ्या लोकांना निवडून द्या मी स्वतः नगरपालिकेत जातीने लक्ष घालून काम करेन’, असं म्हणत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत योजनेला केंद्रस्थानी ठेवतच प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.
महायुतीतच योजनेवरून श्रेयवादाची लढाई
महायुतीतच या बहुचर्चित योजनेवरून श्रेयवादाची लढाई रंगली असून, लाडक्या बहिणींची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी मतांसाठी महायुतीत चढाओढ सुरु झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात येत असून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही दिली आहे.
‘देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’ असं फडणवीसांनी म्हटलंय. तर, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु झाली असून ती कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनीही राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे. त्यामुळे विधानसभेला मतांचं भरभरुन दान देणा-या लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आकर्षित करण्याचा सत्ताधा-यांचा प्रयत्न सुरू असल्याचच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. आता लाडकीचं मत नेमकं कुणाला मिळणार हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होणार हेसुद्धा तितकंच खरं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



