
अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पात्रतेची व्यापक तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ लाख २० हजार ६३८ अर्जांपैकी ७ लाख ३ हजार ८४४ महिलांना आतापर्यंत पाच महिन्यांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
.
राज्य शासनाने निवडणुकीनंतर या योजनेची कडक समीक्षा सुरू केली असून, पात्रतेचे निकष पुन्हा एकदा तपासले जात आहेत. योजनेच्या नियमांनुसार, ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे किंवा ज्या महिला सध्या महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास आहेत, त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील. जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांनी अपात्र महिलांना स्वयंप्रेरणेने योजनेतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले की, तपासणीदरम्यान अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार नाही. संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. या तपासणीनंतर अपात्र लाभार्थ्यांची अंतिम संख्या स्पष्ट होईल.
लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले – तटकरे
दरम्यान, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती दिली. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या 2 लाख 30 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 हून अधिक असणाऱ्या 1 लाख 10 हजार महिलांची नावेही या योजनेतून हटवण्यात आली आहेत.
फेब्रुवारीचा हप्ता केव्हा मिळणार?
दुसरीकडे, या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता केव्हा मिळेल याविषयी महिला वर्गात चर्चा सुरू झाली आहे. जानेवारीचा हप्ता महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मिळाला होता. त्यामुळे या महिन्यातही त्याच कालावधीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारात या योजनेतील अर्थसहाय्याची रक्कम 1500 वरून 2100 करण्याची ग्वाही दिली होती. आता राज्याच्या अर्थसंकल्पात तशी एखादी तरतूद केली जाते काय? असा सवालही या प्रकरणी चर्चिला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.