
Ladki Bahin Yojana Installment: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे एकनाथ शिंदेंनी सोमवारी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विशेष सभा घेतली. वाडा कुंभरोशी येथे झालेल्या सभेत त्यांनी लाडक्या बहिणींना एक गुड न्यूज दिली आहे. एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी देणार याबद्दल भाषणादरम्यान भाष्य केलं आहे.
10 ते 15 हजार लोकांना रोजगार देणारे उद्योग उभे करणार
महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड, कुंभरोशी, वाडा परिसराच्या विकासावर भर देणार असून या परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर, शांत महाबळेश्वर अशी प्रस्थापित करू, अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिकांना दिली. होमस्टे, फार्मस्टे, सेंद्रीय शेती, ग्रामीण पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स, बॅकवॉटर पर्यटन, वेलनेस सेंटर, जलपर्यटन, रोपवे, पर्यटन महोत्सव या माध्यमातून रोजगारनिर्मिती केली जाईल. या भागात उद्योग, सीएनजी प्रकल्प, एमआयडीसी निर्माण करून किमान 10 ते 15 हजार लोकांना रोजगार देणारे उद्योग उभे केले जातील असे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
प्रतापगडाच्या विकासासाठी 160 ते 170 कोटी रुपयांचा निधी
किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी 160 ते 170 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगताना याठिकाणी रस्ता रुंदीकरण, पार्किंग, पर्यटन सुविधा, मंदिर विकास, जलपर्यटन, हायड्रो प्रकल्प, रोपवे अशी कामे करायची आहेत. या सर्व कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही शिंदेंनी स्पष्ट केले. रामवरदायिनी मंदिर, शिवमंदिर पर्यटन, महादेव कोळी समाजाच्या जात पडताळणी, बौद्ध समाजासाठी भव्य भवन, महिला रुग्णालय, उमेद मॉल, पाचगणी आणि सातारा येथील बचत गट विक्री केंद्र निर्माण करू असेही यावेळी शिंदेंनी स्थानिकांना आश्वासीत करताना म्हटलं.
नोकरीसाठी बाहेर गेलेल्या तरुणांना परत आणून रोजगार देणार
रस्ते विकासासाठी पाटण-कराड-वाई-जावळी-महाबळेश्वर मार्गासाठी 140 कोटी, विविध जिल्हा मार्गांसाठी शेकडो कोटी, उंब्रज-मसूर-मायणी-पंढरपूर मार्गासाठी 400 कोटी तसेच अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे शिंदेंनी भाषणादरम्यान आवर्जून नमूद केले. या भागातील जो तरुण नोकरीसाठी बाहेर गेला आहे, तो पुन्हा आपल्या गावात परत यावा, इथेच त्याला रोजगार मिळावा यासाठी या भागात मोठे प्रकल्प आणण्याचे नक्की प्रयत्न केले जातील, असंही शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणीचे 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; कधी ते ही सांगितलं
पुढे बोलताना, लाडक्या बहिणीमुळे तोट्यात असणारी एसटी आता फायद्यात आली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर, “1500 रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी समोर आल्या आहेत,” असं शिंदे म्हणाले. तसेच लाडक्या बहिणींना दिले जाणारा 1500 रुपयांचा हफ्ता 2100 कधी करणार याबद्दलही शिंदे बोलले. शिंदेंनी नेमका हा हफ्ता कधी वाढवून देणार हे सांगितलं नसलं तरी भाषणात बोलताना, “योग्यवेळी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला हा शब्द पाळणार आहोत,” असं देखील शिंदेंनी भाषणातून सांगितलं. “मी बोलतो ते करून दाखवतो,” असं देखील लाडक्या बहिणींना हफ्त्यामध्ये दर महिना 600 रुपये वाढवून देण्याचं आश्वासन देताना म्हटलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



