
Anandacha Shidha Scheme Stopped: महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिली आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीलाही नागरिकांना हा शिधा मिळणार नाही. बहुधा ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे आहेत. राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी सुरु करण्यात आलेल्या आनंदाची शिधा योजनेला लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याचं मत राज्याच्या मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या नेत्याने व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आर्थिक चणचणींमुळे निर्णय?
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामागे लाडकी बहीणचं काही कनेक्शन आहे का? अशी चर्चा सुरु झालेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळांनीही आपल्याला असेच वाटत असल्याचं म्हटलं आहे.
लाडकी बहीणचा फटका
पत्रकारांशी बोलताना, “गणपती व दिवाळीला आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला होता. परंतु वित्त विभागाने शक्य नसल्याचे सांगितले. एका आनंदाचा शिधासाठी 350 कोटींचा खर्च होतो. मला तर तसं वाटते की हा लाडकी बहीणचा फटका आहे. 40 ते 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी लागतात. त्यामुळे त्याचा फटका बसला असू शकतो,” असं स्पष्ट मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं.
अजित पवारही बोलले पैशांचे सोंग घेता येत नाही
“शिवभोजन थाळी योजनेच्या निधीसाठीही आम्हाला प्रयत्न करावे लागतात. वर्षाला 140 कोटी लागतात. आता 70 कोटी रूपये मंजूर झालेत. मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा लागेल, काय करायचं?” असा सवाल भुजबळांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, “सर्वच विभागांना निधीची कमतरता निर्माण झाली आहे. कॅबिनेटमध्येही चर्चा झाली यावर. दादाही (अजित पवारही) बोलले की पैशांचे सोंग घेता येत नाही. सर्व मंत्र्यांच्या गाड्या विकल्या तरी पैसे निर्माण होतील का?” असा सवालही भुजबळांनी केला.
दिवाळी आनंदात जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण…
यंदा गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने 60 लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. लाखो शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांना दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली असताना शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल सुरू झाली नसून इतक्या कमी कालावधीत आनंदाचा शिधावाटप करणे अवघड असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.
केवळ कागदावर योजना?
कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अनेकदा जाहीर केले. मात्र लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्या योजना सोडल्या, तर अनेक योजनांसाठी निधीच न देण्याचे धोरण स्वीकारल्याने त्या केवळ कागदावर उरल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या सरकारने नेतृत्वाखालील शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.