
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे होणार आहे. स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास रोख १,२५,००० रुपये, चांदीची गदा, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी डॉ. महेश थोरवे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ आणि महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धेचे सचिव प्रा. विलास कथुरे उपस्थित होते. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होईल, तर पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. रामेश्वर (रुई) चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. या समारंभास ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि अर्जुन अवॉर्डी पै. नरसिंग यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र श्री पै. विजय उर्फ विकी बनकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १९वे वर्ष असून, यासाठी महाराष्ट्रातील नामवंतांसह देशभरातील मल्लांना निमंत्रित करण्यात आले आहे. महावीर केसरी गटातील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास ‘महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी’ हा बहुमानाचा किताब, रोख १,२५,००० रुपये, चांदीची गदा व सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. द्वितीय क्रमांकास रोख १,००,००० रुपये, तृतीय क्रमांकास ५० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त, ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ आणि ८६ प्लस ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रुपयांची पारितोषिके, सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक, मेडल, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधनही दिले जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



