
Raj Thackeray Slams Mangal Prabhat Lodha Over Kabutarkhana Issue: मुंबईतील दादरमधील कबुतरखान्याजवळ बुधवारी मराठी एकीकरण समितीने कबुतरांना दाणे टाकू नये या निर्णयाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांची धरपकड करण्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. जैन समाजाच्या आंदोलनामध्ये शस्र घेऊन आलेल्यांविरोधात कारवाई केली पाहिजे असंही राज ठाकरे म्हणालेत. एवढ्यावरच न थांबता राज ठाकरेंनी जैन समाजाचं 6 ऑगस्ट रोजी आंदोलन झालं तेव्हा या ठिकाणी पोहोचलेले मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरही निशाणा साधला आहे.
तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती
राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष यांच्यासोबत आज बैठक घेतली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक वांद्रे येथील एम आय जी क्लब इथे पार पडली. बैठक संपवून बाहेर पडताना राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना कबुतरखाना आंदोलनासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी लोढांवर निशाणा साधला. “कबुतरखान्यासाठी त्यांच्याकडून (जैन समाजाकडून) आंदोलन झालं. आपल्या मराठी लोकांनाही (हायकोर्टाच्या निर्णयाच्या) समर्थनार्थ आंदोलन केलं. ज्यावेळेला त्यांच्याकडून आंदोलन झालं तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती. जी झाली नाही,” असं राज म्हणाले.
लोढा मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाबद्दल काय म्हणाले होते?
बुधवारी मराठी कबुतरखान्याजवळ आंदोलकांची धरपकड झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीने आंदोलन सुरु केल्याचा संदर्भ देत लोढांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. प्रतिक्रिया देताना, “मी सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की पत्रकार म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती समजून घेत प्रश्न विचारा. मी त्याचं स्वागत करतो,” असा सल्ला लोढांनी दिला. “पण याबद्दल आज माझी भूमिका ही आहे की याबद्दल मी आज काही बोलणार नाही,” असं सांगत लोढा पत्रकारांना टाळून पुढे निघून गेले होतो.
सरकारला नेमकं हवंय काय?
“ज्या लोकांनी सुऱ्या वैगेरे आणल्या असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. काल जे काही मराठी लोक गेले होते तेव्हा तिथे जी काही धरपकड झाली, धक्काबुक्की झाली, पत्रकारांनाही मारलंय तर मला असं वाटतं हा काय प्रकार सुरु आहे मला कळलं नाही. सरकारला नेमकं हवंय काय?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. “या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजांमध्ये त्यांनी आधी हिंदी आणून बघितलं. तिकडे लागतेय का (आग) बघितलं. आता त्यांनी कबुतरं आणली. आता या पुढे कुठले प्राणी येतात ते मला माहित नाही,” अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी नोंदवली.
लोढांना कानपिचक्या
पुढे राज यांनी, “लोढा-बिढासारखी माणसं मध्ये येतायेत. लोढा मंत्री आहेत. ते कोणत्या समाजाचे मंत्री नाहीत. त्यांनी कोर्टाचा आणि महाराष्ट्राचा नीट मान राखला पाहिजे,” असं प्रसारमाध्यमांना खोचक टोला लगावताना म्हटलं.
FAQ
जैन समाजाच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंनी काय म्हटले?
उत्तर: राज ठाकरेंनी सांगितले की, जैन समाजाने 6 ऑगस्ट 2025 रोजी कबुतरखाना बंदीविरोधात आंदोलन केले, तेव्हा काही लोकांनी शस्त्रे आणली होती. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी होती, पण ती झाली नाही.
मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावर राज ठाकरेंनी काय मत मांडले?
उत्तर: मराठी एकीकरण समितीने कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड आणि धक्काबुक्की केली, तसेच पत्रकारांनाही मारहाण केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारला नेमके काय हवे आहे, असा सवाल विचारला.
कबुतरखाना वादाला राजकीय रंग का प्राप्त झाला आहे?
उत्तर: राज ठाकरेंनी खोचकपणे सांगितले की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने आधी हिंदीचा मुद्दा काढला आणि आता कबुतरखाना वाद आणला. ते म्हणाले, “आता पुढे कुठले प्राणी आणतात, माहिती नाही,” यातून त्यांनी सरकारवर समाजांमध्ये फूट पाडण्याचा आणि राजकीय फायदा घेण्याचा आरोप केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.