
Vijay Wadettiwar: काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. दरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळू नये असं म्हणत फडणवीसांनी वडेट्टीवारांना चांगलंच सुनावलंय.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मावरून चांगलंच राजकारण पेटलंय. दरम्यान याच हल्ल्यासंदर्भात बोलताना काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच्या एका वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.हिंदूंचं नाव विचारून गोळ्या मारण्याऐवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर वडेट्टीवारांनी मिठ चोळू नये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं.
विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.. विजय वडेट्टीवारांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका बावनकुळेंनी केली.
काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालंय. मग विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत? दहशतवाद्याला जात-धर्म नसतो असं म्हणून कोणाला खूश करु पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना ‘निर्दोष’ ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हे देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे. काँग्रेस भारतीयांच्या जखमांवर मीठ चोळत आहे.
आपण केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो हे लक्षात येताच विजय वडेट्टीवारांनी सारवासारव केलीय. दहशतवादी शक्तींच्या नायनाट करण्यासाठी सरकारच्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच दोन समुदायांना लढवण्याच्या हेतूनं दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या एका सवालानंतरही वाद निर्माण झाला होता.. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता.
पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या झाडल्याचं अनेक पर्यटकांनी सांगितलं. दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावल्याचं पुण्यातील एका तरुणीनं सांगितलंय, तर मुस्लीम नसल्याचं म्हणत दहशतवाद्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली असं एका व्हिडीओत नौदल अधिकाऱ्याची पत्नी सांगताना दिसतेय.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार धर्मावरुन राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुनच गोळ्या झाडल्यात हे तिथल्या पर्यटकांनीच सांगितलंय. तरीही या मुद्द्यावरुन वारंवार राजकारण का केलं जातंय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.