
वसमत शहरातील बसस्थानक परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २६ कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी फरार कार चालकाचा शोध सुरु केला आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील रोडगा येथील दिलीप उत्तम कदम (४०) हे बुधवारी ता. २५ सायंकाळी कामा निमित्त वसमत येथे आले होते. वसमत शहरात काम आटोपून ते शहरालगत असलेल्या एका पेट्रोल पंपावर नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणावरून भेटून रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते पायी बसस्थानकाकडे येत होते. यावेळी गवळी मारोती मंदिराकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. या अपघातानंतर कार चालकाने कारसह पळ काढला.
वसमत बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या नागरीकांना अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरीकांनी अपघातात जखमी झालेल्या दिलीप यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृ्त्यू झाल्याचे जाहिर केले.
या प्रकरणी मारोती कदम यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कार चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार नय्यर शेख पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी कार चालकाचा शोध सुरु केला आहे. मयत दिलीप कदम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.