
Wai Tention Over Pahalgam Attack: देशरामध्ये काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यात सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची दाट शक्यता असून भारताने तातडीने निर्णय घेत पाकिस्तानसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारी स्तरावर या प्रकरणावरुन घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे मयत पर्यटकांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून भारतीयांचे डोळेही पाणावले आहेत.
पहलगाममधील हल्ल्यातील मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीमधील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा समावेश आहे. सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील दोन दिवसांमध्ये विशेष विमानाने काश्मीरमध्ये अडकलेले 500 हून अधिक पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून थेट पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे.
नेमकं घडलं काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वाईमध्ये राहणाऱ्या शुभम कांबळे नावाच्या युवकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटसला थेट पाकिस्तानचा झेंडा ठेवला. इतकंच नाही, तर भारत देशाबद्दल शुभमने स्टेटला आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे शुभम राहत असलेल्या गावात आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
मित्रानेच दाखल केली तक्रार
सदर प्रकाराची माहिती आरोपी शुभमच्या मित्रालाच मिळाली आणि त्यानेच वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुभमला ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शुभमने नेमकं असं का केलं? यामागील त्याचा उद्देश काय आहे याबद्दलची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे.
साताऱ्यातील मुस्लीमांनी जाळला पाकिस्तानी झेंडा
साताऱ्यात मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पहलगाम येथील घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा ध्वज जाळला. साताऱ्यातील पोवई नाक्यावर पाकिस्तानचा विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून जाळण्यात आला. निरपराध नागरिकांना मारणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी, सकल मराठा मुस्लिम समाज संघटनेच्या अरबाज शेख यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.