
अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयात ‘जेम्स ट्रेड फेअर २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, उद्योगशीलता आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा फेअर गुरुवार, ५ फेब्रुवारीपासून सुरू झाला. या फेअरचे उद्घाटन प्रसिद्ध सनदी लेखापाल विजय जाधव यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी विद्याभारती शैक्षणिक मंडळाच्या उपाध्यक्षा मेजर डॉ. मिथिलेश राठौर, सचिव डॉ. अशोक चव्हाण, कोषाध्यक्ष रघुनाथ रोडे, विद्याभारती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रज्ञा येनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी. पांडे, श्रीमती प्रतिभाताई पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर शिरभाते, आय.टी.आय.चे प्राचार्य गजानन तंवर, विद्याभारती जेम्सचे समन्वयक एच. के. सिसोदिया आणि एच. आर. डायरेक्टर प्रा. मनिंदर मोंगा, तसेच इव्हेंट इन्चार्ज डॉ. पूजा दम्माणी, प्रा. अथर इकबाल, प्रा. लविना जैन यांचीही उपस्थिती होती. विद्याभारती कॅम्पसमधील विविध महाविद्यालयांतील २५०० विद्यार्थ्यांनी या ट्रेड फेअरमध्ये सक्रिय सहभाग घेतला. एकूण ५४ स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली व्यावसायिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि व्यवस्थापन क्षमता प्रभावीपणे सादर केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशील दृष्टिकोन रुजावा, नवनवीन कल्पनांना वाव मिळावा आणि स्वयंरोजगाराची बीजे रोवली जावीत, या उद्देशाने विद्याभारती जेम्स या विद्यार्थी समूहाने या फेअरचे आयोजन केले आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि तरुणांना स्वावलंबी बनवणे हा देखील या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. ट्रेड फेअरमध्ये विविध गटांमध्ये पारितोषिके देण्यात आली. यामध्ये बेस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया, बेस्ट फूड, बेस्ट गेम, बेस्ट आर्ट अँड स्किल, बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी, बेस्ट टीमवर्क अँड प्रेझेंटेशन आणि बेस्ट एंटरप्रेन्युअर (बेस्ट स्टॉल) यांचा समावेश होता. उत्कृष्ट व्यवसाय आणि नफा मिळवणाऱ्या स्टॉलधारकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीसे देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता हंतोडकर, एफएमसीजीचे संचालक निलेश खेमचंदानी आणि चार्टर्ड अकाउंटंट श्रद्धा अग्रवाल यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



