
विधिमंडळांसाठी ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ असावा, ज्यामुळे प्रत्येक राज्यातील कामगिरी पारदर्शकपणे जनतेसमोर येईल, असे मत दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी व्यक्त केले. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५व्या ‘भारतीय छात्र संसदे’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गुप्ता म्हणाले की, संसदेत जाताना कुठल्याही पक्षाचे नाही, तर जनसामान्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे संसदेचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. येथे विवेक, संयम, तर्क-वितर्क आणि समस्यांच्या मुद्द्यांवर खेळ भावनेने चर्चा व्हावी. संसदेत संवाद, संस्कृती बळकट करण्यासाठी विधायक चर्चा आणि परस्पर आदर-सन्मान आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह, वरिष्ठ पत्रकार व लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथील हवामान बदल व्यवस्थापनाचे प्रा. वॉल्टर लील फिल्हो यांचा समावेश होता. भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी सुमित खैरे, पायल झा, निखिल मिश्रा, अक्षिता सक्सेना हेही यावेळी उपस्थित होते. विजेंदर गुप्ता यांनी राजकारण आणि खेळ हे एकाच नाण्याचे दोन पैलू असल्याचे सांगितले. देशाचा विकास, परंपरा आणि भविष्य निर्मितीवर संसदेत चर्चा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुप्ता पुढे म्हणाले की, लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि येथे झालेले समाधान संपूर्ण समाजासाठी असते. दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. माध्यमांचीही जबाबदारी आहे की त्यांनी केवळ गोंधळ दाखवण्याऐवजी मुद्द्यांवरील चर्चेला प्राधान्य द्यावे. यावेळी दिग्विजय सिंह यांनी राजकारणात ५६ इंच छाती नाही, तर गरीब आणि पीडित लोकांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. राष्ट्रवाद म्हणजे द्वेष नव्हे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी द्वेषाचे राजकारण केले नाही. सध्याचे राजकारण द्वेषाचे आणि शत्रुत्वाचे बनले आहे. राजकारणात खेळाडू वृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, धर्म आणि जात नंतर येते. कोणालाही देशद्रोही किंवा देशभक्त ठरवण्याचा अधिकार नाही. लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्याला संविधान वाचविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



