
Navi Mumbai Airport Name Issue: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच हे विमानतळ उभारणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानींसहीत अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या सोहळ्यामध्ये कुठेही दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. स्थानिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्तावही सरकारकडून केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. मात्र बुधवारच्या लोकार्पण सोहळ्यात दि. बा. पाटलांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही किंवा मोदींनीही त्यांच्या भाषणात अशी काही घोषणा केली नाही. त्यामुळेच आता नावावरुन संभ्रम कायम असतानाच एका खासदाराने या विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यास गौतम अदानींचा विरोध असून नरेंद्र मोदी अंतरराष्ट्रीय विमानतळ असं या विमानतळाला नाव देण्यासाठी अदानी आग्रही असल्याचा दावा केला आहे.
अर्धवट काम झालेल्या विमानतळाचं उद्घाटन
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरेंच्या काळात केंद्राकडे दिला. प्रधानमंत्र्यांनी काल अर्धवट काम झालेल्या विमानतळाचं उद्घाटन केलं. दि. बा. पाटलांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. गौतम अदानी यांचा या नावाला विरोध आहे,” असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी केला आहे.
‘मोदींचं नाव देण्याची मागणी’
“नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्यावे अशी भाजपअंतर्गत चर्चा, सूचना, मागणी आहे,” असा दावाही राऊतांनी केला आहे. “जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमला मोदींचं नाव दिले आहे. मोदींच्या नावावर एकमत झालं. नाव जाहीर न करण्यामागे भाजपची भूमिका आहे. नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावासाठी अदानी यांचा आग्रह आहे,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.
अदानी किंवा मोदी विमानतळ
“भाजपच्या निमंत्रण पत्रिका स्थानिक पातळीवरील होती. एकतर अदानी किंवा मोदी विमानतळ म्हणून ओळखलं जाईल. मात्र दि बा पाटील हेच नाव द्यावे. मोदी हे विष्णूचे अवतार आहेत. ते अजरामर आहेत,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांसाठी पैसा नाही पण मोदींच्या प्रसिद्धीसाठी आहे
“मोदींच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे पैसे, त्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज काढतील,” असा टोला राऊतांनी मोदींच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन लगावला. “शेतकरी मदतीसाठी मात्र पैसे काढतील,” असं राऊत म्हणाले. “शनिवारी मराठवाड्यात आमचा मोर्चा आहे. त्यात उद्धवजी बोलतील. आधीच्या सरकारने केलेल्या कामांची मोदींनी उदघाटने केली. फीत कापली, क्रेडिट घेतलं. लोकांच्या हे लक्षात आलं,” असंही राऊत म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.