
प्रथमेश तावडे, झी मीडिया
Vasai Crime News: वसईत तरुणीने तिच्याच बहिणीच्या घरी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीने वेश बदलून घरात प्रवेश केला होता. आरोपी तरुणीने साधारणपणे दीड कोटींच्या दागिन्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी १२ तासात नवसारी येथे आरोपी महिलेस अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात हरल्यामुळं घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी या तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याचा कट रचला. यासाठी तिने इंस्टाग्रामवरून पुरुषाचा वेष मिळवला त्यानंतर घरात घुसून तिने तब्बल दीड कोटींचे दागिने लंपास केले. मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासांत दागिने जप्त करून आरोपीला अटक केली आहे
ओधवजी खिमजी भानुशाली, वय 66 वर्षे, हे घरात एकटेच असताना, एक दाढीवाला पुरुष कच्छी भाषेत बोलत “मला रूम हवी आहे, मला मदत करा” असे सांगून घरात शिरला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्यामुळे त्याला घरात घेतले आणि गजरा समाजाविषयी बोलल्यामुळे त्याच्याविषयी त्यांना आपुलकी वाढली. तेव्हा आरोपी तरुणीने वॉशरूममध्ये जायचे आहे असे सांगितले आणि वॉशरूममध्ये जाऊन “तुमचे बाथरूम लिकेज झाले आहे” असे सांगून ते दाखवण्याच्या बहाण्याने ओधवजी यांना त्या बाथरूममध्ये ढकलून आतून कोंडले आणि घरातील मौल्यवान दागिने घेऊन पसार झाला.
भानुशाली यांनी खिडकीची काच उघडून आरडाओरडा केला ते्व्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाथरुममधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक कॅप घातलेल्या पुरुषाच्या वेशातील इसमाला बॅग घेऊन जाताना दिसले. पुढे तपास करताना, त्या परिसरातील झुडपात बॅग लपवलेली आढळून आली. काही वेळाने एका महिलेने येऊन ती बॅग उचलून घेतली असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसले. तपासाचा माग काढत पोलीस गुजरातमधील नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, वय २७ हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून दीड कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरील रिल पाहून वेशांतर केले अशी माहिती तिने पोलिसांनी दिली आहे. आरोपी महिला चोरी केल्यानंतर वसई स्थानकात गेली तिथून ट्रॉली बॅग खरेदी केली आणि एका लॉजमध्ये कपडे बदलून गुजरात येथे गेली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.