
राज्यात एकीकडे शेतमालास भाव नसल्याने शेतकरी उध्वस्त होत असतांना दुसरीकडे राज्यातील फडणवीस सरकार शक्तिपीठ महामार्गातून ४० हजार कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी ता. ९ येथे केला आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात संषर्घ पदयात्रेनंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश पदाधिकारी मोहन जोशी, सचिन नाईक, जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे, जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, गजानन देशमुख, विनायक देशमुख, मिलींद उबाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना सपकाळ म्हणाले की, राज्यात शेतीमालास भाव नाही त्यामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हे सरकार आंधळे व बहिरे असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी, कष्टकरी, तसेच महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पदयात्रा काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गाळात प्रत्येक जिल्हयात तालुक्यात या पदयात्रेच्या माध्यमातून पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला गोरगरीबांचा विचार करणारा पंतप्रधान हवा आहे, मात्र आपले पंतप्रधान श्रीमंतांचा विचार करतात, गरीब व श्रीमंतांमधील दरी दुर करण्याचा प्रयत्न केला जात नाही. अंबानी, आदानी साठी केंद्र व राज्यातील सरकार काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरीकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणार, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेच नाही. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष एपस्टीन फाईल्सच्या माध्यमातून पंतप्रधानांना ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर ट्रॅम्प यांनी फोन करतात ऑपरेशन थांबविण्यात आले अन ५६ इंचाची छाती साडेपाच इंचाची झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फडणवीस सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी संपूर्ण कर्जमाफी दिलीच नाही. त्यामुळे लबाडाचे अवतान जेेवल्या शिवाय खरे नाही अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ४० हजार कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालास भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



