
Rupali Thombre on BJP Medha Kulkarni: शनिवारवाड्यातील नमाज पठणावरुन भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनानंतर रुपाली ठोंबरे पाटील मैदानात उतरल्या आहेत. यामुळे महायुतीमध्ये सत्तेत बसलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीमधून बाहेर पडण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे का? असा प्रश्न विचारला असता रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
सरकारमधून बाहेर पडणार का? असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “का बरं आम्ही पडायचं? तिने राजीनामा दिला पाहिजे. ती बाई वातावरण करते तिचा खासदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. आमचा संघर्ष भाजपाशी नसून, सलोखा बिघडवणाऱ्यांविरोधात आहे. आमचा बाप हिंदू आहे. आमचं हिंदुत्व काढायला मेधा कुलकर्णींनी प्रमाणपत्र दिलं आहे का? आम्ही त्यांच्यासारखे हिंदू नाहीत, जे सामाजिक सलोखा बिघडवत आहेत”.
सत्तेतून बाहेर पडण्याचा कोणताही राजमार्ग आम्ही शोधत नाही आहोत. मेधा कुलकर्णींना आम्ही शनिवारवाड्यात, ऐन दिवाळीत जाऊन हे कृत्य करायला सांगितलेलं नाही. शिक्षिकेचं त्यांचं डोकं, नेमकी कोणती पदवी घेतली आहे माहिती नाही. त्यांनी केल्याने मी रुपाली ठोंबरे आणि राष्ट्रवादीचा आमचा विचार त्यानुसार आंदोलन करत आहोत.
रुपाली ठोंबरे यांना मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, “हा विषय वळवण्यात आला आहे. शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होतं. 1936 साली पुरातन विभागात या मजाराची नोंद आहे. तेव्हा माझा सोडा पण या मेधाताईंचाही जन्म झाला होता का? किंवा त्या हिंदू संघटनांचाही जन्म झाला होता का?”.
“मी अजून सातबारा काढलेला नाही. तो मला काढायचा आहे. मला माहिती मिळाली आहे त्यानुसार, पूर्वी दिवाबत्ती करायला आधीच्या मुस्लिमांना एक रुपया मानधनही मिळत होतं. त्यामुळे जाणीवपूर्वक तेढ निर्माण कऱण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी हे केलं आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे त्यांनी म्हटलं की, “नमाज पडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नमाज पठण केल्याने शनिवारवाड्याला नेमका कोणता धोका निर्माण झाला? हे पोलिसांनी सांगावं”. तुम्ही नमाज पठणचं समर्थन करता का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “मी आता तिथे हनुमान चालिसा म्हणते. तिथं ख्रिश्चन लोक बायबल म्हणतील. कोणत्याही धर्मातील माणसाने प्रार्थना केली म्हणून ती जागा त्यांच्या नावावर होणार नाही.
“तुम्ही खासदार आहात ना. छत्रपती शिवाजी महाराज कोणताही जात-धर्म मानत नव्हते, आंबेडकरांनी सगळ्यांना समान ठेवण्यासाठी संविधान आणि कायदा आणला. सरकार कायद्यावर, संविधानावर चालतं. खासदाराला आता इतकी अक्कल नसेल, तर अशा बायांना का खासदारकी देतात? आणि सामाजिक वातावरण बिघडवतात हे समजत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
आमचे पालकमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. “आमच्या कसबा मतदारसंघात मध्यवर्ती पेठेत वाड्यांमध्ये पीर, हनुमान, मरीआई, देवीचं मंदिर आहे. त्यामुळे तो वाडा खासगी होता. कोणी हिरवा लावला असेल, तुम्ही भगवा लावल्याने मालकी तर मिळाली नाही ना? त्यांना हिरव्यावर इतका राग असण्याचं कारण काय? हिंदू धर्मात हिरवा रंग म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे,” असंही त्यांनी म्हटलं,
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.