
“वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी खंबीर पाठिंबा दिला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि संबंधित संघटनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाचे समर्थन करत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पवार साहेबांनी जे म्हटले आहे, ती खरी वस्तुस्थिती आज आहे. बाहेर राज्यातून येणारे काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात. वारकरी संप्रदाय अन् तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत तरी संतांच्या विचाराचे आहेत. पण त्या विचारांवर अतिक्रमण किंवा संक्रमण करण्याचा प्रयत्न प्रतिगामी किंवा मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराचे लोक करत आहेत. संतांच्या विचारांवर अतिक्रमणाचा प्रयत्न रोहित पवार म्हणाले की, “संतांनी नेहमीच भेदभावाचा निषेध करून समतेची शिकवण दिली. मात्र, आज काही राजकीय पक्ष आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या प्रतिगामी संघटना वारकरी संप्रदायात संक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राबाहेरील काही नेते आणि तथाकथित गुरुवर्य येथे येऊन आपल्या संतांविरुद्ध बोलतात, पण हे प्रतिगामी लोक तेव्हा मूग गिळून गप्प बसतात. ज्यांनी वारकरी संप्रदायावर हल्ले केले आणि वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, तेच लोक आज पवार साहेबांवर टीका करत आहेत. साहेबांनी मांडलेली भूमिका ही आजची वस्तुस्थिती आहे.” ‘ब्लॅक मॅजिक’ प्रकरणावरून भाजपवर संशय भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी धक्कादायक शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “पुरोगामी महाराष्ट्रात जर काही नेते ‘ब्लॅक मॅजिक’ (जादूटोणा) करत असतील, तर त्यांची नावे समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे आणि अनेक गोष्टी बाहेरही आल्या आहेत. मात्र, अद्याप काही बड्या नेत्यांची माहिती का दडवली जात आहे? त्या व्हिडिओंचा आणि पुराव्यांचा वापर भाजप राजकीय दबाव आणण्यासाठी किंवा नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी करत आहे का?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. दादांकडे बघून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य करताना आपण सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार असल्याचे रोहित पवार म्हणालेत. अजित दादांकडे बघून नक्कीच त्या ठिकाणी, प्रचाराला जाईल फॉर्म भरायला बोलावले नसले, प्रचाराला बोलावलं नसले तरी ही ही निवडणूक आताच्या उमेदवाराकडे बघून होती असे नाही. अजितदादांचे कार्य, अजितदादांची पद्धत स्टाईल आणि त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य या सगळ्या गोष्टीकडे बघून ही निवडणूक त्या ठिकाणी होत असल्याचेही रोहित पवार म्हणालेत. त्यांनी प्रचाराला बोलावलं, नाही बोलवलं तरी आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रचार करू. जी लीड अजितदादांना मिळायची त्या ठिकाणी सुनेत्रा काकींना मिळावी, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल असे रोहित पवार म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






