
Balasaheb Thackeray Death Sharad Pawar Comment: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपूर्वी अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना भेटू दिलं नव्हतं, असा दावा शिंदेंच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा दोन दिवस छळ केल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदमांनी दसरा मेळाव्यातील भाषणामधून केला. यावेळेस त्यांनी शरद पवारांनी केलेल्या विधानाचाही संदर्भ दिला. मात्र आता या आरोपाला ठाकरेंच्या शिवसेनेनं उत्तर दिलं आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना रामदास कदमांनी, शरद पवारांनाही बाळासाहेबांना शेवटचं भेटण्यासाठी ‘मातोश्री’च्या वरच्या मजल्यावर पाठवलं नव्हतं, असा दावा केला. “शरद पवारांनाही वरती पाठवलं नव्हतं. अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला उद्धव त्रास देत आहे हे त्यांचे शब्द होते. उद्धव ठाकरे तुम्ही हे पाप केलं आहे,” असं रामदास कदम भाषणात म्हणाले. याच भाषणात त्यांनी, “उशिरा का होईना महाराष्ट्राला तुमचे धंदे कळू देत. अनके गोष्टी बोलणार नाही, पण वेळ पडली तर सोडणार नाही. बाळासाहेब उद्धव ठाकरेंबद्दल काय बोललेत ते आत आहे, ते बोलायला लावू नका,” असा इशाराही दिला.
पवारांच्या त्या कथित विधानावर काय म्हणाले परब?
रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवरुन ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळ त्यांना उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ करत होते आणि त्यावर शरद पवारांनी आक्षेप घेतल्याचा संदर्भ रामदास कदमांनी दिल्याचं सांगत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अनिल परबांनी, “शरद पवार हयात आहेत ना? ते त्या आरोपाचं उत्तर देवू शकतात ना? मिलिंद नार्वेकरही आहेत,” असंही म्हटलं. “कोण डॉक्टर आहेत ज्यांनी खोटी माहिती पसरवली?” असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> बाळासाहेबांच्या ‘त्या’ फोटोने प्रकरणाला कलाटणी? अनिल परबांनी मोबाईलमध्ये काय दाखवलं?
…म्हणून बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण
“पक्ष घेतला, माणसे घेतली पण तरीही काही होत नसल्याने आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत,” असं अनिल परब म्हणाले. “रामदास कदम हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे. हे भिकेचा कटोरा घेवून फिरत होते. माझी आई वारली तेव्हा मी यांच्या निवडणुकीची सुत्रे हाती घेतली होती,” अशी आठवण परब यांनी सांगितली.
नक्की वाचा >> ‘ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतलं की जाळलं? याची चौकशी करावी’; ठाकरेंच्या सेनेची मागणी
हा विषय आता का?
“इतके दसरे झाले पण आता विषय का? पालिका निवडणूक आहे. इतर विषयांपासून लोकांचे लक्ष वेधायचे आहे,” असं परब यांनी म्हटलं. “भाड खावून पैसे कमवतो, त्याची काही किंमत नाही. दलालीचे पैसे खात्यात त्याची किंमत शून्य आहे. कोर्ट ठरवेल त्यांना किती दंड करायचा. मृत्यूपत्राला जयदेव ठाकरेंनी आव्हान दिले होते. चार पाच वर्षे कोर्टात केस चालवली पण काही झाले नाही. ज्यांना शंका आहे त्यांनी कोर्टात जावे,” असा सल्ला परब यांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.