
Pune : मॅट्रिमोनियल साईटवर बनावट नावाने ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या इंटरनॅशनल सायबर ठगाला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई एअरपोर्टवर अटक केली आहे. त्याने खराडी भागात राहणाऱ्या महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अभिषेक शरदचंद्र शुक्ला असे अटक केलेल्या ठकाचे नाव आहे.
आरोपी शुक्लाने शादी डॉट कॉम मॅट्रिमोनियल साईटवर खोट्या नावाने प्रोफाईल तयार केले होते. ऑस्ट्रेलियन नागरिक, डॉक्टर रोहित ओबेरॉय असे बनावट प्रोफाईल तयार करून, त्याने 2023 मध्ये फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवत त्याने महिलेला जाळ्यात ओढून दोघेजण काही दिवस एकत्र राहत होते. दरम्यान, महिलेला पहिल्या पतीकडून 5 कोटी रुपये पोटगी मिळाल्याचे लक्षात आल्यावर आरोपी शुक्लाने तिचा विश्वास संपादित केला. त्याने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली 3 कोटी 60 लाख रुपये उकळले. आरोपीने तिला “इव्हॉन हँन्दयानी” व “विन्सेंट कुआण” नावाच्या साथीदारांची ओळख करून देत सिंगापूरच्या बँकेत रक्कम भरण्यास भाग पाडले.
आरोपीचा साथीदार विन्सेंटने सप्टेंबर 2024 मध्ये महिलेला ईमेल पाठवत “डॉ. ओबेरॉय मरण पावले” असे सांगितले. त्यावरून फिर्यादीला संशय आल्याने तिने माहिती घेतली असता, त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेने तातडीने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत आरोपीचे खरे नाव अभिषेक शरदचंद्र शुक्ला असल्याचे उघडकीस आणले. त्याचे लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर 25 जून 2025 रोजी तो सिंगापूरहून मुंबईत विमानतळावर आल्यावर अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक सुशील डमरे, बाळासो चव्हाण, संदीप मुंढे , नवनाथ कोंडे, संदीप पवार, संदीप यादव यांच्या पथकाने केली.
आरोपीने शादी डॉट कॉमवरून तब्बल 3 हजार 194 महिलांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पुणे सायबर पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शादी डॉट कॉमवर प्रोफाईल SH87341231 या व्यक्तीकडून फसवणूक झाली असल्यास सायबर पोलिसांशी 7058719371 / 7058719375 यावर संपर्क करा. तसेच मॅट्रिमोनियल साईटवर ओळख वाढवताना सतर्क राहा. शहानिशा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. ‘कस्टमने पकडले’ म्हणून कोणी पैसे मागितल्यास रक्कम वर्ग करू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.
शादी डॉट कॉमवरून महिलेसोबत ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने आरोपीने साडे तीन कोटींवर रक्कम स्वतः कडे घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, आणखी अशाच प्रकारे त्याने काही हजारांत महिलांशी संपर्क साधला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.