
नीतेश महाजन, झी 24 तास, जालना: जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकताना अडथळा येतोय. शाळेभोवती साचलेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात बेडूक आलेत. या बेडकांच्या ओरडण्यानं नेमकं शिक्षकांनी काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळेनासं झालंय. याबद्दल जाणून घेऊया.
ग्रामीण भागातल्या समस्याचं वेगळ्या असतात. जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मोठा पाऊस पडला आणि शाळेच्या मैदानाचं तळं बनलं. इतकंच नाही तर त्यात साप आणि बेडूकही आश्रयाला आले. त्यामुळे शाळेत येणा-या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्गात तास सुरू झाला की विद्यार्थ्यांना बेडकांचं डराव डराव सोडून काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे शिक्षकांनी नेमकं काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही.
पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोरच्या डबक्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी केली जाते.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यात या शाळेसमोर असंच पाणी साचतंय. वारंवार तक्रारींचा पाढा वाचूनही दुर्लक्ष केलं जातंय.. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. आता तरी लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शाळेच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
शाळांना सुरुवात झाली असताना शाळेसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. रुवी कदम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. रुवीचे पालक तिच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवतात. ज्यात ते रुवीच्या जीवनातील अनेक आनंदी क्षण सोशल मीडियात अपलोड करत असतात. असाच एक क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाळा सुटलेली दिसतेय. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर उभे आहेत. शाळेची घंटा वाजली आणि एक एक मुलं बाहेर येऊन आपल्या पालकांना भेटतंय आणि घरचा रस्ता पकडतंय. पण रुवीच्या बाबतीत याऊलट घडतंय. घरी जाण्याऐवजी पुन्हा शाळेत जाण्यासाठी रुवी रडतेय. ‘तिथे शाळेत जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटले तरी तिला स्कूल ला जायचे होते’, अशी कॅप्शन रुवीच्या पालकांनी व्हिडीओवर लिहिलीय. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. मॅडम आईपेक्षा जास्त लाड करणारी भेटली असे वाटायला लागले आहे, अशी मिश्किल कमेंट एकाने केलीय. नव्वदीच्या मुलांना अर्धी शाळा घरी घ्यायला यायची आणि उचलून घेऊन जायची, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिलीय.वाह! पुढे जाऊन ही मुलगी आयएएस, आयपीएस होणारं, अशी प्रतिक्रियादेखील देण्यात आलीय.काही दिवसांनी हीच शिक्षकांचा क्लास घेईल असे वाटते. शिस्त म्हणजे शिस्त. अशी प्रतिक्रिया एकाने लिहिलीय. घरी एवढा त्रास का देता तुम्ही? आई वडिलांच्या वादाला कंटाळलं असेल बाळ, अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिलीय. मागच्या आठवडाभरात या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या पाहायला मिळतायत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.