
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातील दिग्गजांनीही मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हेदेखील आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते, मात्र गर्दीमुळे त्यांना आत प्रवेश मिळू शकला नाही. यावेळी आपली खंत व्यक्त करताना ते अत्यंत भावुक झाले. ज्या दादांसोबत मी अनेक वर्षे उठलो-बसलो, आज त्यांच्याच दर्शनासाठी आत जाता आले नाही. आता फोन करताच ‘शिंदेंना आत घेऊन या’ असे हक्काने सांगणारा माणूसच राहिला नाही, अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख मांडले. एका जवळच्या मित्राला आणि खंबीर पाठीराख्याला गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हात जोडून तिथून निघणे पसंत केले. यावेळी बोलताना आनंद शिंदे म्हणाले, आता काहीच सुचत नाही. आत इतकी गर्दी आहे की मी सुद्धा आतमध्ये जाऊ शकलो नाही. ही खेदाची गोष्ट आहे की मी इथपर्यंत येऊन त्यांचे दर्शन घेऊ शकलो नाही. ज्या दादांसोबत मी बसलो उठलो, कोणाचे काही काम असले की मी थेट दादांना फोन करायचो. मग दादा सांगायचे शिंदेंना घेऊन या. पण आता दादाच तिथे आहेत मग मला कोण फोन करून बोलावून घेणार. दादांना शेवटचे भेटता येत नसल्याने आनंद शिंदे भावुक झाले होते. तसेच त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखांचा जनसमुदाय, समर्थक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत अजित दादा पंचतत्वात विलीन झाले. धडाडीचे नेतृत्व आणि विकासकामांचा झपाटा लावणारा एक कणखर नेता हरपल्याची भावना जनसामान्यांमध्ये आहे. आता पुन्हा कधीही सभेच्या व्यासपीठावर किंवा पत्रकार परिषदेत दादांचा तो रोखठोक आणि मिश्किल आवाज ऐकू येणार नाही, या विचाराने त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते भावुक झाले आहेत. आपल्या हक्काच्या माणसाला अखेरचा निरोप देताना उपस्थित असलेल्या प्रत्येकाला भावना अनावर झाल्या होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



