
शिराळा वनक्षेत्रातील 21 ग्रामस्थांना शिक्षण आणि धर्मशिक्षणाच्या अनुषंगाने सजीव नाग प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अटी व शर्तींच्या अधीन राहून नाग पकडण्याची मुभा देण्यात आली आहे.
.
या 21 अर्जदारांनी अभ्यास आणि शिक्षण करण्याच्या उद्देशाने नाग पकडण्यासाठी विहित नमुन्यात परवानगीची मागणी केली होती. त्यानुसार, पर्यावरण, वन आणि जल वायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून आवश्यक त्या अटी व शर्तींसह ही परवानगी मंजूर करण्यात आली आहे.
मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी
ही परवानगी केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आणि स्थानिक लोकांमध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारित करण्याच्या हेतूनेच दिली आहे. यामध्ये कोणताही व्यावसायिक वापर, मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक किंवा खेळाला सक्त मनाई आहे.
नागांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे बंधनकारक
21 अर्जदारांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने नाग पकडल्यास, तसेच स्पर्धा, मिरवणूक किंवा खेळासारखे प्रकार केल्यास, त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम, 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. ज्या अर्जदारांना परवानगी मिळाली आहे, त्यांना नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यामार्फत आणि वन व वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हे काम करणे बंधनकारक आहे. नागांचा कोणताही मृत्यू होणार नाही याची काळजी घेणे आणि पकडलेल्या नागांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे बंधनकारक आहे.
नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा ही शिराळ्याची एक खास ओळख होती. मात्र, 2002 साली प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागांची पूजा बंद करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे या परंपरेला खंड पडला. तेव्हापासून ग्रामस्थ ही प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे सातत्याने मागणी केली होती आणि आता या मागणीला यश आले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल असे आश्वासन दिले होते. या परवानगीमुळे शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमीला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.