
Sanjay Raut on Padma Bhushan to Bhagat Singh Koshyari: केंद्र सरकारने रविवारी 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या श्रेणींमध्ये 131 नागरी सन्मानांना मंजुरी दिली आहे. पद्मभूषण जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही समावेश आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत संजय राऊतांनी महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते अशी टीका केली आहे.
संजय राऊतांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
“महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026
एकनाथ शिंदेंची पोस्ट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोस्ट शेअऱ करत मानकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचाही उल्लेख आहे.
“वेगवेगळ्या क्षेत्रांतील आपल्या असामान्य कर्तृत्वाचे आदर्श देशासमोर ठेवणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वांना भारत सरकारतर्फे गौरविण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील थोर अभिनेते-कलावंत धर्मेंद्र यांना मृत्युपश्चात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करून केंद्र सरकारने त्यांच्या कलाक्षेत्रातील महान योगदानाचा यथोचित गौरव केला आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच गायिका अलका याज्ञिक, कै.पियूष पांडे, उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर अमिदा फर्नांडिस (आरोग्य), अशोक खाडे (उद्योग), भिकल्या लाडक्या धिंडा (कला), जनार्दन बापूराव बोठे (सामाजिक कार्य) जुझेर वासी (विज्ञान), माधवन रंगनाथन (कला), रघुवीर खेडेकर (कला), रोहीत शर्मा (क्रीडा), कै.सतीश शहा (कला), सत्यनारायण नुवाल (उद्योग), श्रीरंग देवबा लाड (शेती) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सन्मानात मानाचा तुरा खोवणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्रांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



