
Raj Uddhav Aditya Thackeray: राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमधील जवळीक पाहता आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. त्यातच आज महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही सोबत होते. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. यावेळी तिघांनी एकाच कारमधून प्रवास केल्याने त्याचीही चर्चा झाली.
मंत्रालयासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ‘शिवालय’ कार्यालय आहे. मंत्रालयात निवडणूक आयोगाची भेट घेण्यापूर्वी शिवालयात सर्व नेते पोहोचले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास दानवे (Ambadas Danve), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अनिल देशमुख (Anil Deshmukh), बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्यासह अनेक नेते शिवालयात पोहोचले होते. शिवालयात या सर्व नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर सर्व नेते मंत्रालयासाठी रवाना झाले.
शिवालयात पोहोचले तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपापल्या कारमधून पोहोचले होते. उद्धव ठाकरे आधी आले होते आणि त्यानंतर राज ठाकरे, शरद पवार पोहोचले होते. दरम्यान शिवालयामधून मंत्रालयात जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या मागच्या सीटवर आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढच्या सीटवर बसलेले होते.
मविआसह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी आयोगासमोर अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांमधील घोळ यासह व्हीव्हीपॅटच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी अनेक परखड सवाल केले आहेत.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लागणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया निकालाच्या अडचणी आणि मतदार यादीमधील घोळ यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. आगामी महानगरपालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्या यासाठी ही भेट घेतली आहे…शरद पवार, उद्धव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, शरद पवार, जयंत पाटील, हे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांना भेटले. दरम्यान, या भेटीत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला अनेक परखड सवाल केले आहेत.
– निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. त्यामुळे, नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही, असेही राज यांनी म्हटलं.
– जे आज 18 वर्ष वय पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
– अनेक जिल्ह्यात दोन-दोन ठिकाणी मतदारांची नावं आहेत, त्याचं काय करायचं, असा सवालही राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला
– मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं, असाही प्रश्न राज ठाकरेंनी आयोगापुढे उपस्थित केला आहे
– मतदारयादीतील एका मतदाराच्या मतदार ओळखपत्रावर पाहिले असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याची बाब राज ठाकरेंनी निदर्शनास आणून देत प्रश्न केला
– निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. त्यामुळे, राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे आयोगाला विचारले आहेत.
– 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅट मशीन लावा, अशी सूचनाही राज ठाकरेंनी केलीय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.