
शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पुर्तता न करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने बुधवारी ता. ११ चार तालुक्यांमध्ये मोर्चा काढला. यावेळी क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा देण्यात आल्या.
.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा वादा केला होता. मात्र निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आज कळमनुरी येथे माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, बाळासाहेब मगर, डी के दुर्गे, नागोराव करंडे, रुपेश देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या शिवाय औंढा नागनाथ येथे तालुका प्रमुख गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर सेनगाव येथे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी सभापती रुपाली पाटील गोरेगावकर, दिनकरराव देशमुख, परमेश्वर मांडगे, प्रविण महाजन, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. तसेच वसमत येथे सुनील काळे, अनिल कदम, डॉ. डी. बी. पार्डीकर, उध्दव सावंत, काशीनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला.
या चारही ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहिर केले होते. मात्र सत्ता हाती आल्यानंतर सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
उद्या हिंगोलीत रास्ता रोको आंदोलन
शासनाच्या विरोधात ठाकरे गटाकडून गुरुवारी ता. १२ सकाळी आकरा वाजता हिंगोली ते कनेरगाव मार्गावर दंत महाविद्यालयाजवळ रास्तारोको आंदोलन केले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.